रायगड : राज्यावर घोंगावणारे दुष्काळाचे सावट लक्षात घेता शासनाने केलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या आवाहनाला पेण तालुक्यातील दुर्गम पाबळ खोऱ्यातील ग्रामस्थांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. साकव संस्थेच्या पुढाकारातून, जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आणि स्थानिक आदिवासी व कुणबी बांधवांच्या श्रमदानातून परिसरातील नद्या व नाल्यांवर सिमेंट गोण्यांचे मजबूत बंधारे बांधण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे संपूर्ण खोऱ्यातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून, उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
डोंगरदऱ्या व नदी-नाल्यांनी वेढलेल्या पाबळ खोऱ्यातून वाघेरा, काकण कोंड आणि मोहाडीच्या पायथ्यापासून वाहणाऱ्या तीन मुख्य नद्या पुढे निगडा नदीच्या रूपात अंबा नदीला (धरमतर खाडी) जाऊन मिळतात.
या वाहत्या पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी साकव संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुरे यांच्या पुढाकाराने आणि अरुण शिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाववाड्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांचा वापर करून नदीपात्रात बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात वरप ग्रामपंचायत हद्दीतील धायरवाडी, बोरीचा माळ, पाहिरमाळ, चिचवाडी, पाबळ ग्रामपंचायत हद्दीतील जांबोशी, कोंडवी, बरडावाडी, पाबळ आणि जीर्णे खोऱ्यातील चाफेगणी येथे सुमारे ६० ते ७० फूट लांबीचे भक्कम बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले आहे.
यानंतर दुसऱ्या टप्प्यात झापडी, मोहाडी, गवळवाडी, उसर आणि कुरनाड येथे बंधारे बांधण्याचे नियोजन असून, त्यासाठी पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती कार्यकर्ते उमेश दोरे व गजानन भोईर यांनी दिली. ‘रामजी योजना’मध्ये बंधाऱ्यांच्या कामाचा समावेश नव्हता. हे लक्षात घेता शिष्टमंडळाने जलसंधारणाचा प्रस्ताव मांडला.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पाहणी दौरा
या मोहिमेला प्रत्येक गावच्या वाड्यांतील प्रमुख व ग्रामस्थांनी मोठी साथ दिली. मयूर नाईक, शिवदास जाधव, अनंता हंबीर, जगन कदम, हरीश वारगुडे, पांडुरंग दोरे, भूषण वाघमारे आणि लक्ष्मण वीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष कामात मोठे योगदान दिले. या बंधाऱ्यांमुळे खोऱ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, हे पाणी उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत जपून ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, या कामाची वॉटर संस्थेचे प्रशांत, जेएसडब्ल्यू कंपनीचे अनुराग पाटील, संगम म्हात्रे, नाटेकर तसेच साकव संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुरे, डॉ. सुरेंद्र धुमाळ आणि संतोष वाघमारे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व कामाचे कौतुक केले.