Pen Minor Girl Case Pudhari
रायगड

Pen Minor Girl Case: पेण तालुक्यात ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

झुडपात मृतदेह आढळला, आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

पेण: पेण तालुक्यातील पाटणेश्वर हद्दीतील काजुर्ले आदिवासी वाडीत मानवतेला काळीमा फासणारी आणि संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी संतापजनक घटना घडली. अवघ्या पाच वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचे पहाटे घरातून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

या अमानुष घटनेने परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली असून, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पेण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला अटक केली.

सोमवारी मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास घरात झोपलेली बालिका अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल, पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबविण्यात आली.

डॉग स्कॉड आणि मोबाईल फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. शोधादरम्यान आदिवासी वाडीशेजारील झुडपात बालिकेचा मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी विविध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासात परिसरातील किरण भिकू वाघमारे वय (वर्ष 24 ) याने अत्याचार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल आणि पोलिस उपअधीक्षक विजय शिवथरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेने केवळ पेण तालुकाच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. निष्पाप बालिकेवरील या क्रूर अत्याचारानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पेणमधील आदिवासी समाजातील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्या ही अत्यंत वेदनादायी, संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषीला कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पोलिसांनी जलद, निष्पक्ष तपास करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा. तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी बालसुरक्षा, समाजप्रबोधन आणि सामूहिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक आहे. या चिमुरडीच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
- डॉ. वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT