Raigad Gauri Festival pudhari photo
रायगड

Raigad Gauri Festival: हात सोडून डोक्यावर तोल सांभाळत नाचवली जाणारी अनोखी गौराई

Raigad Latest News: : खारपाटातील आगळ्या परंपरेचा आजही मोठा उत्साह

पुढारी वृत्तसेवा

रायगड : डोक्यावर ठेवलेला गौरीचा पाट, दोन्ही हात पूर्णपणे सोडलेले आणि भजनाच्या तालावर लीलया चिखलातून व शिडीवरून तोल सांभाळत चालणारी पावले... पेणच्या खारपाटातील महिलांच्या या अद्भूत कौशल्याने आणि परंपरेने यंदाचा गौराई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

गणेश आगमनानंतर येणाऱ्या या गौराईच्या उत्सवात निसर्गाशी जोडलेले नाते आणि महिलांचे हे अनोखे वैशिष्ट्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.पेण व खारपाट भागात गौराईसाठी शाडूची मूर्ती वापरली जात नाही. त्याऐवजी तेरड्याची रोपे, अग्निशिखा (नागवेल) आणि जंगलातील 'भेंड्याच' पिवळी फुले वापरून गौराई साकारली जाते. या नैसर्गिक वनस्पतींनाच 'गौरीची पत्री' मानले जाते. या सर्व वनस्पती औषधी गुणधर्मांनी युक्त असून या दिवसांत गौराईला 'कवला' या वनस्पतीची भाजी विशेष आवडते, अशी लोकधारणा आहे.

गौरीच्या आगमनानंतर या भागात भजने, भवर नाच, रामायण-महाभारतावर आधारित गाणी, तसेच लोकगीते गायली जातात. महिला फुगड्या, झिम्मा, कोंबडा यांसारखे पारंपारिक खेळ खेळतात, तर पुरुष नाच व उखाणे सादर करून या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात.या उत्सवात महिलांच्या तोल सांभाळण्याच्या कौशल्याचा सुरेख संगम पाहायला मिळतो. भाल येथील सरोज अशोक म्हात्रे शेतातील चिखलातून दोन्ही हात सोडून दीड तास डोक्यावरील गौरीचा तोल सांभाळत नाचवतात. तसेच स्त्रिया गौरीच्या पाटाला हात न लावता, शिडीच्या ३ ते ४ पायऱ्या डोक्यावरील गौरीसह चढतात व उतरतात.

वढावमधील शकुंतला म्हात्रे, अहिल्या म्हात्रे, वाशीच्या संगीता पाटील, फणसडोंगरी-पेण येथील रंजना राम म्हात्रे आणि सापोलीतील हरिश्चंद्र म्हात्रे हे गौरी नाचवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तांबडशेत, हमरापूर, कांदळे येथेही डोक्यावर गौरी नाचवली जाते, तर रेवदंडा येथील गौरी 'उभ्या गौरी' म्हणून प्रसिद्ध असून त्यांना बांबूच्या कांबटीचा आधार दिला जातो.

गौराई ही सासरहून माहेराला केवळ दीड दिवसाच्या पाहुणचारासाठी येते. गौरीच्या आगमनानंतर तिचे पूजन, आरती आणि नैवेद्य अर्पण केला जातो. दुसऱ्या दिवशी विसर्जन करताना महिला पाटाला हात न लावता भजनाच्या तालावर नाचत विसर्जनासाठी नेतात. काही ठिकाणी स्त्रिया स्वतः पाण्यात उतरून गौरीचे विसर्जन करतात. आपल्या माहेरवाशिणीचे प्रेमाने स्वागत करणारा आणि निसर्गाचे महत्त्व जपणारा हा खारपाटातील गौराईचा उत्सव अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा होत असतो अशी माहिती खारोपाटीतील परंपरांचे अभ्यास देवीदास म्हात्रे गुरुजी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT