कमलेश ठाकूर
पेण: पेण तालुक्यातील पंधराशेच्या आसपास असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सुमारे १६ ते १७ लाखांच्या आसपास शाडू मातीच्या गणेशमूर्ती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची निर्मिती होत असल्याने सुमारे सहा ते सात हजार बेरोजगारांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध झाला आहे.
म्हणून हा हस्तव्यवसाय पेण तालुक्यातील करागिराना एक वरदान ठरला आहे. आतापर्यंत सुमारे १६ लाखहून अधिक गणेशमूर्ती देशविदेशात रवाना झाल्या असून यातून १०० कोटींची उलाढाल झाली आहे.
एकट्या पेण शहरात गणेशमूर्तीच्या निर्मितीचे ५५० ते ६५० च्या घरात रजिस्टर्ड कारखाने आहेत. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर कारखाने ग्रामीण भागात व शहराच्या विभागात पाहायला मिळतात. मात्र, यापैकी बारमाही चालणारेही ग्रामीण व शहरी भागात शेकडो कारखाने आहेत.
यात प्रभात कलामंदिर, गणेश कलामंदिर, दीपक कला केंद्र, कल्पना कलामंदिर, सागर आर्ट, अनिल आर्ट, त्रिमुर्ती केंद्र, अष्टविनायक कला केंद्र, सुहास आर्ट, दामोदर कला केंद्र, हमरापूर येथील दाभाडे बंधू, ऐश्वर्या आर्ट, कुणाल आर्ट, मळेघर-किशोर कला केंद्र, शिर्की, जोहे, गडब, तांबडशेत, कळवा, कांदळेपाडा, वडखळ, दादर, कोप्रोली, धोडपाडा उंबर्डे आदी अनेक गावांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील कारखान्यांपैकी पेणच्या कल्पना कला मंदिर व प्रभात कलामंदिर अशा मोजक्या कारखान्यातील कामगारांना फॅक्टरी अॅक्टप्रमाणे रोजंदारी व अन्य सुविधा दिल्या जात आहेत.
इतर बहुतांशी कारखानदार रोजंदारीने कामे करून घेत आहेत. त्यात त्यांना ३०० ते ४०० रूपये तर जुन्या कामगारांना ६०० ते ७०० रूपये रोज दिला जातो. आखणी कामासाठीचा दर एका छोट्या मूर्तीसाठी ४० रूपयांपासून ८० रूपयांपर्यंत असतो.
अखेरच्या जुलै, ऑगस्ट महिन्यात रात्रपाळीसाठी प्रत्येक तासाला वाढीव ४० ते ५० रूपये इतका दर दिला जात आहे. या हस्त व्यवसायात निव्वळ ६ ते ७ हजार कामगारांना रोजगार मिळतो आहे. या कलाकुसरीत तालुक्यात शंभर कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल होत असते.
असे असले तरी कारागीरांना भासणारा तुटवडा, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीच्या किंमतीत सतत होणारी वाढ, रंगांच्या किमतीत झालेली वाढ, सरस, गोंद अभ्रक, कुंचले, सफेदी वॉर्निश आदी साहित्यांचा वाढत्या किमती यामुळे मुर्तीच्या किंमती यावर्षीही २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
पूर्वी १०० रूपयांची शाडूची माती गोण ३०० ते ५०० रूपये किमतीची झाली आहे. याआधी आठमणी (१०० किलो) गोणीला नगन्य किंमत होती. मात्र ही खडा माती असल्याने ती कुटून चाळून घ्यावी लागत होती. आता ती दळून येवू लागली असल्यामुळे त्यातील श्रम कमी झाले आहेत. त्यातच रंगाचे वाढते भावही या धंदयाला अडचणीत आणणारी बाब आहे.
३० वर्षापूर्वी चांगल्या प्रतीच्या सफेदाच्या आत एकमणी गोणीला ३० रू. किंमत होती. आज सध्या सफेदच्या २५ किलो गोणीला ९०० ते एक हजार रूपये किंमत झाली आहे. काही वर्षापूर्वी इंग्लिश कलरमुळे मूर्तीचे रंगकाम अत्यंत उठावदार व्हायचे. परंतु त्यांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने ते वापरणे शक्य होत नाही. तरीही कॅमल कंपनीने रंग देखील चांगल्या प्रतीचे असल्याचा मूर्तिकारांचा दावा आहे.
मातीची मूर्ती तयार करण्यासाठी पहिली संकल्पना पेण येथे साकारली
अगदी सुरूवातीला शेजारील डोंगरावरील माती आणून मूर्ती तयार केली जात होती. चुना, हळद, हिंगुळ, रेवाचिनी, दिव्याची काजळी, सोनेरी वर्खाची पाने वापरून मूर्तीच्या अंगावरील वस्त्र, दागिने व अन्य अवयवांचे रंगकाम केले जात होते. पुढे या मूर्तीना जशी मागणी वाढू लागली तसा येथील मूर्तीकारांना व्यापक विचार करावा लागला.
वास्तविक मूर्ती तयार करणसाठी लागणारी शाडूची माती येथे उपलब्ध नव्हती. ती गुजरात राज्यातून आणावी लागते. तर या उदयोगासाठी लागणारे रंग, गोंद, कुंचले, ब्रश, अभ्रक पॉलिश पेपर आदी साहित्य मुंबई- पुण्यावरून आणून मूर्तीकलीचा व्यवसाय केला जात आहे.