पेण: रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण शहरामध्ये गेली अनेक दशकांपासून पेणकरांना खड्डेमय आणि अरुंद रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पालिका प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन पावसाळ्यापूर्वीच पेण शहरातील महत्त्वाचे रस्त्यांच्या रुंदीकरणासह काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतल्याने समस्त पेणकर समाधान व्यक्त करत आहेत.
असे असले तरी याच रस्त्यांसोबत पेणच्या बाजारपेठेचे जे गल्लीत रूपांतर झाले आहे त्याचे देखील रस्त्यात रूपांतर व्हावे आणि पेणकर ग्राहकांना तेथे देखील खरेदी करत असताना मोकळा श्वास घेऊन खरेदी करता यावी असा देखील महत्वाचा निर्णय पालिका प्रशासनाने घ्यावा असे मत सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले आहे.
पेण पालिका निवडणुका होऊन दोन ते तीन महिने होतात न होतात तोच तातडीने सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाने पेण शहरातील विकासकामांना सुरुवात केली आहे. निवडणुका झाल्यानंतर नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आमदार रविंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना पालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान आम्ही निवडणुका आचारसंहिता संपताच शहरातील रस्ते आणि त्याचे रुंदीकरण याला प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले होते. आज शहरातील याच रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण होत असल्याने दिलेल्या शब्दाची पूर्तता होत असल्याचे दिसून येत आहे.
वाहतूककोंडी सुटणार
पेण शहरातील पालिका मक्यापासून ते अगदी बुंडा पूल म्हणजेच विसर्जन घाटापर्यंत सुसज्ज असा काँक्रिटीकरणाचा रस्ता होत आहे. त्याचप्रमाणे पेण बारस्थानकाच्या मागीलमहत्वाचा समजला जाणारा रस्ता देखील अतिक्रमणे तोडून काँक्रीटीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
त्यामुळे या महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास यातून मुक्तता होणार असल्याने पेण शहरातील नागरिक या रस्ते काँक्रीटीकरण आणि रुंदीकरण या महत्वाच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
पेण शहरातील बहुतांश बाजारपेठ ही मिरची गल्ली म्हणून ओळखली जाते. रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे हे स्वागतार्ह आहे. रस्ता रुंदीकरणात काहींची दुकाने तुटली आहेत, त्यामुळे एकावरच अन्याय न करता बाजारपेठेतील जी गटारे आहेत त्यावरील दुकानांच्या पायऱ्यांचे पक्के बांधकाम देखील तोडून या गटारांना मोकळा श्वास घेता यावर, जेणेकरून सफाई कामगारांना ही गटारे साफ करता येईल आणि पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबणार नाही.- हरीश बेकावडे, सामाजिक कार्यकर्ते