Pahalgam Terrorist Attack Pudhari Online
रायगड

Pahalgam Terrorist Attack | पनवेलच्या ‘निसर्ग टुर्स’च्या गटावर दहशतवादी हल्ला

Pahalgam Terrorist Attack | काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात पनवेलच्या दिलीप देसले यांचा मृत्यू, तर सुबोध पाटील गंभीर जखमी. ३९ पर्यटकांच्या गटावर हल्ला झाला.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: विक्रम बाबर

काश्मीरमधील निसर्गसंपन्न पेहेलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेल येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून, आणखी एक पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव दिलीप देसले (वय ४५) असून, गंभीर जखमी झालेल्याचे नाव सुबोध पाटील (वय ४२) आहे. सध्या त्यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(Pahalgam Terrorist Attack)

ही घटना काश्मीरच्या पर्यटन हंगामात मोठी खळबळ उडवणारी आहे. पनवेलमधील 'निसर्ग पर्यटन टुर्स' या पर्यटन संस्थेद्वारे जम्मू-काश्मीरला गेलेल्या ३९ पर्यटकांच्या गटावर हा हल्ला करण्यात आला. या पर्यटकांमध्ये पनवेलमधून ३४, उरण येथून २ आणि ठाणे येथील ३ पर्यटकांचा समावेश होता.

पेहेलगाममध्ये पर्यटकांचे वाहन जात असताना अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. हल्ल्यात दिलीप देसले यांचा जागीच मृत्यू झाला. सुबोध पाटील गंभीर जखमी असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत. देसले यांच्या निधनामुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा आघात ठरला आहे.

प्रशासनाकडून मृत व्यक्तीच्या शवाचे पनवेलमध्ये आणण्याची तयारी सुरू असून, सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पर्यटनासाठी काश्मीरकडे जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT