पेण शहर ः स्वप्नील पाटील
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या आणि मुंबई - गोवा महामार्गाला लागून असणाऱ्या पेण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचा कल वाढत चालला आहे. मात्र आजही पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात बऱ्याच गोष्टी आवश्यक असून महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना गरजेच्या असणाऱ्या डायलिसिस मशीनच्या प्रतिक्षेत समस्त पेणकर रुग्ण आहेत.
दरम्यान ही डायलिसिस मशीनची व्यवस्था देखील लवकरच पेणकरांच्या सोयीसाठी उपलब्ध होईल असे उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी अरुणादेवी राजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पेणमधील खाजगी रुग्णालयांचा विचार करता येथील आदिवासी आणि तळागाळातील ग्रामीण भागातील गरिबातल्या गरीब रुग्णांना या खाजगी रुग्णालयातील दर परवड नसल्याने साहजिकच या रुग्णांचा कल उपजिल्हा रुग्णालयाकडे वाढला आहे. त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयात असणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्थेवर आलेला ताण लक्षात घेता मधल्या काळात येथील स्वच्छता, डॉक्टरची कमतरता, अपुरा औषध पुरवठा, इमारतीची डागडुजी आदी गोष्टीची ओरड निर्माण झाली होती.
मात्र आता या रुग्णांचा वाढता कल लक्षात घेऊन येथील रुग्णालय व्यवस्थापनाने योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सद्यस्थितीला या रुग्णालयात 50 बेडची व्यवस्था असून लवकरच यात वाढ होऊन या बेडची संख्या 200 वर पोहोचणार आहे. पेण उपजिल्हा रुग्णालयात सर्व मेडिकल ऑफिसर उपलब्ध असून बालरोग तज्ञ आणि फिजिशियन देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे या रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ जरी नसला तरी प्रकृतीसाठी येणाऱ्या महीला रुग्णांसाठी विशिष्ट महिला डॉक्टरांची सोय करण्यात आली असून दरमहा किमान पाच ते सात सिजर या उपजिल्हा रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडत आहेत.
सद्यस्थितीला या रुग्णालयात चार जनरेटरची व्यवस्था असून रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यास या जनरेटर द्वारे विद्युत पुरवठा सुरळीत केला जात आहे. रुग्णालयात 108 आणि 102 अशा दोनही प्रकारच्या रुग्णवाहिका उपलब्ध असून त्या तातडीने रुग्णासाठी उपलब्भ करण्यात येत आहेत.
सदर रुग्णालयात एक्स रे मशीन आणि सोनोग्राफी मशीन देखील उपलब्ध असून औषध पुरवठा देखील समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र सध्याच्या वाढत्या श्वानांची संख्या लक्षात घेता स्वानदंशाचे प्रमाण वाढले किंवा मोठ्या प्रमाणात श्वान दंश झाल्यास संबंधित डोस कमी पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे जी कर्मचाऱ्यांची संख्या 11 हवी ते कर्मचारी सद्यस्थितीला 5 असल्याने थोडीफार गैरसोय होत आहे मात्र ती परिस्थिती देखील आम्ही आमच्या स्तरावर योग्य रीतीने हाताळतो असे देखील येथील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
एकंदरीतच सद्यस्थितीला पेण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांचा वाढता कल आहे. आजही डायलिसिस मशीनची खऱ्या अर्थाने रुग्णांची मागणी आहे त्या डायलिसिस मशीनच्या प्रतिक्षेत पेण तालुक्यातील रुग्ण असून ही मशीन सुद्धा लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा रुग्णालय व्यवस्थापनाने प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.
पेण तालुक्यातील खाजगी दवाखान्यातील वाढते दर हे सामान्य रुग्णाला परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचा कल उपजिल्हा रुग्णालयात वाढला आहे, याचा विचार करून या रुग्णालयात राज्य सरकारने तातडीने अद्ययावत सुविधा देणे क्रमप्राप्त आहे. विशेष करून सध्या पेणमध्ये डायलिसिसचे बरेच रुग्ण आहेत आणि त्यांना अमाप पैसे मोजावे लागत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा लवकरात लवकर सुरू करावी.किरण म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते - पेण
पेण उपजिल्हा रुग्णालयात मागील काही वर्षांपेक्षा आता तालुक्यातील रुग्णांचा कल वाढत आहे. त्यानुसार आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू आहे. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या समस्येनुसार लवकरच डायलिसिस मशीनची देखील व्यवस्था करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. फक्त रुग्णांच्या नातेवाईकांना एकच आवाहन असणार आहे की रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणल्यावर कोणत्याही अडचणी असतील तर एकमेकांच्या सल्लामसलतनुसार त्या समस्यांचे निरसन करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया.डॉ. संध्यादेवी राजपूत, वैद्यकीय अधिकारी, पेण उपजिल्हा रुग्णालय