पनवेल : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, २३ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, शहरातील उंच जलकुंभनिहाय वेगवेगळ्या भागांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पनवेलकरांना आता पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाले आहे. धरणातील उपलब्ध पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याचे निर्देश शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निर्णयाद्वारे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी वितरणाचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोमवार ते शनिवार शहरातील वेगवेगळ्या जलकुंभांशी संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी मात्र शहरातील सर्व भागांत नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
सोमवारी जुन्या पनवेलमधील विविध भागांना फटका
सोमवारी मार्केटयार्ड, भाजी मार्केट आणि चौकोनी टाकी (डब्ल्यूटीपी) या जलकुंभांशी संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये पटेल पार्क, जैन मंदिर, गणपती मंदिर, माणिकनगर, अशोका गार्डन, केशवबाग, घाटेआळी, परदेशी आळी, गावदेवी पाडा, मांडवकरवाडा, जयभारत नाका, गोडसे आळी, विरुपाक्ष मंदिर परिसर, मनिष मार्केट, कापड बाजार, रतन टॉकीज परिसर तसेच अन्य परिसरांचा समावेश आहे.
मंगळवारी पटेल मोहल्ला, पायोनिअर परिसरात पाणी बंद
मंगळवारी पटेल मोहल्ला आणि पायोनिअर या उंच जलकुंभांमधून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पायोनिअर सोसायटी जलकुंभ तसेच ठाणा रोड परिसरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.
बुधवार ते शनिवार टप्प्याटप्प्याने पाणी कपात
बुधवारी एचओसी उंच जलकुंभाचा संपूर्ण भाग, गुरुवारी ठाणा नाका जलकुंभाअंतर्गत संपूर्ण साईनगर परिसर, शुक्रवारी गोल टाकी (डब्ल्यूटीपी) अंतर्गत मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी भाग १ व २ आणि एस. के. बजाज परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी गंगाराम सिनेमा उंच जलकुंभाअंतर्गत तक्का गाव आणि कॉलनी परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, उपलब्ध पाण्याच्या साठ्यानुसार पाणी वितरणाच्या वेळेत वेळोवेळी बदल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता (पाणीपुरवठा) यांनी केले आहे.