पनवेलमध्ये नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये किचन शेडची उभारणी  Pudhari
रायगड

Panvel News | पनवेलमध्ये नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये किचन शेडची उभारणी: वादग्रस्त ठेकेदार पुन्हा चर्चेत, महापालिकेच्या भूमिकेवर संशय

पनवेलमध्ये नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये ठेकेदाराने अनधिकृत किचन शेड उभारल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

Panvel theater parking issue

पनवेल: छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये कँटिन चालवणाऱ्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर पत्र्याचा शेड उभारून किचन उभारल्याचा प्रकार समोर आला आहे. या शेडसाठी पालिकेकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. नाट्यगृहाच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड कसे उभे राहिले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाट्यगृह हे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज अनेक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या ठिकाणी उपहारगृह चालवण्याची परवानगी मैत्री कॅटरर्स या ठेकेदाराला देण्यात आली आहे. मात्र, अन्न गरम करण्यासाठी स्वतःची जागा नसल्याने ठेकेदाराने पार्किंगच्या एका कोपऱ्यात मोठा शेड उभारला आहे. विशेष म्हणजे, या शेडबद्दल पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीच नाही. या शेडमध्ये नेमके काय चालते, याचीही माहिती पालिकेकडे नाही.

हा ठेकेदार यापूर्वीही वादग्रस्त ठरला आहे. नुकत्याच पावसाळ्यात स्थलांतरित नागरिकांना दिलेल्या नाश्त्यात आळ्या आढळल्याचा प्रकार याच ठेकेदाराच्या खाद्यपदार्थात घडला होता. त्यावेळी पालिकेने केवळ नोटीस बजावून कारवाई केल्याचा देखावा केला, मात्र ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ठेकेदार पालिकेच्या मर्जीत असल्याचा आरोप होत आहे.

नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये उभारलेले हे शेड नियमबाह्य असून, त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे आणि आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्वलनशील पदार्थ ठेवण्यासाठी आवश्यक परवानगी न घेता हे शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे "नियम मोडून उभारलेले हे शेड तातडीने पाडावे आणि संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी," अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

नाट्यगृहाच्या परिसराती शेडबाबत अधिकृत माहिती घेऊन चौकशी केली जाईल आणि परवानगी घेतली नसेल, तर योग्य ती कारवाई देखील केली जाईल.
- डॉ. वैभव विधाते
नाट्यगृहातील कँटिनचा ठेका दिलेल्या ठेकेदाराला केवळ, कँटिनमधील पदार्थ गरम करण्यासाठी किचन आवश्यक आहे. मात्र, पार्किंग मध्ये शेड उभा केले असेल तर चौकशी केली जाईल. याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल.
- राजेश डोंगरे, नाट्यगृह व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT