Ashwini Bindre Murder Case
पनवेल : नवी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या मृत्यूची अधिकृत नोंद करून मृत्यू दाखला देण्याच्या प्रक्रियेला अखेर शुक्रवारी (दि.४) पूर्णविराम मिळाला. पनवेल तहसीलदारांनी ३१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने मृत्यू दाखला तयार करून तो अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांच्या स्वाधीन केला. त्यामुळे तब्बल १७ महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
अश्विनी बिंद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या झाली होती. या बहुचर्चित हत्याकांडाचा न्यायालयीन निकाल २१ एप्रिल २०२५ रोजी लागला. न्यायालयीन प्रक्रियेत त्यांच्या हत्येचे वास्तव स्पष्ट झाल्यानंतरही अधिकृत मृत्यू दाखला मिळविण्यासाठी कुटुंबीयांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली.
बिंद्रे या नवी मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. हत्येपूर्वी त्या कळंबोलीतील रोडपाली परिसरात वास्तव्यास होत्या. तहसीलदारांनी ३१ जुलै रोजी संबंधित जन्म-मृत्यू निबंधकांना आदेश देत ११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिंद्रे यांचा मृत्यू झाल्याची नोंद करून त्यांचे पती राजू गोरे यांना तत्काळ मृत्यू दाखला देण्याचे निर्देश दिले होते.
या आदेशानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मागविलेली तब्बल ४०० हून अधिक पानांची कागदपत्रे जन्म-मृत्यू निबंधक कार्यालयात सादर करण्यात आली. त्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार मृत्यू दाखला देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
शुक्रवारी हा दाखला राजू गोरे यांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत्यू दाखला उपलब्ध नसल्यामुळे अश्विनी बिंद्रे यांची मुलगी सुची हिच्या पुढील शिक्षणासह मृत्यूनंतर मिळणाऱ्या विविध शासकीय व इतर लाभांच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. आता अधिकृत मृत्यू नोंद झाल्याने या प्रक्रियांना गती मिळणार आहे.
मृत्यू दाखला मिळाल्यानंतर राजू गोरे यांनी पनवेल तहसीलदार, महापालिका आयुक्त मंगेश चितळे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 17 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर मृत्यू दाखला हाती आल्याने बिंद्रे-गोरे कुटुंबीयांचा प्रदीर्घ प्रशासकीय प्रवास संपला आहे.