Swastika Ghosh Gold Medal Commonwealth Table Tennis Championship
पनवेल : पनवेलच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची ठरणारी कामगिरी करत पनवेल येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका संदीप घोष हिने कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे देशासह महाराष्ट्र आणि पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या स्वस्तिका घोषने शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती साधली आहे. वेगवान, आक्रमक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळाच्या जोरावर तिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्णपदकाने तिच्या कारकिर्दीत आणखी एका ऐतिहासिक यशाची भर पडली आहे.
स्वस्तिकाच्या या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुण भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य तथा आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, क्रीडा संचालक डॉ. विनोद नाईक, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. येवले, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले. स्वस्तिकाच्या सुवर्ण यशानंतर विविध क्रीडा संस्था, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वस्तिका घोष हिने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून महाविद्यालय, पनवेल आणि देशाचा गौरव वाढविला आहे. तिची ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून भविष्यातही ती अशाच प्रकारे देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास आहे.- प्राचार्य डॉ. एस. के. पाटील