कोंडीमुक्त पनवेलसाठी पॉड टॅक्सीची संकल्पना pudhari photo
रायगड

Panvel pod taxi project : कोंडीमुक्त पनवेलसाठी पॉड टॅक्सीची संकल्पना

शिवसेना नगरसेविका सायली सरक यांचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

पनवेल ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‌‘पॉड टॅक्सी‌’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

या संदर्भात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकल्पाबाबत सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून, पनवेलमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत अनुकूलता दाखवली आहे. तसेच, नगरसेविका सरक यांनी महापौर नितीन पाटील आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनाही यासंदर्भात निवेदन दिले आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, भविष्यातील गरज ओळखून पालिकेमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानुसार पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, या उपक्रमावेळी कळंबोली शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, प्रेम डांगे, प्रेम गोडसे, सुनील खताळ, अंकित सरगर आदी शिवसैनिक उपस्थित होते. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे. यावर शाश्वत उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रणाली प्रभावी ठरू शकते.
सायली सरक, नगरसेविका,पनवेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT