पनवेल : तळोजा वाहतूक विभागातील पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे एका मोठ्या अपघाताची शक्यता टळली. क्राउन कंपनी चौकात डंपर आणि रिक्षामध्ये झालेल्या जोरदार धडकेनंतर रिक्षा उलटण्याच्या स्थितीत असताना वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत रिक्षा सावरली. त्यामुळे रिक्षातील दोन महिला प्रवासी आणि रिक्षाचालक अशा तिघांचे प्राण बचावले.
तळोजा परिसरातील क्राउन कंपनी चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना डंपर आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. या धडकेमुळे रिक्षाचा तोल जाऊन ती उलटण्याच्या स्थितीत आली. हा प्रकार पाहताच तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता रिक्षाच्या दिशेने धाव घेतली. पूर्ण ताकदीनिशी रिक्षाला आधार देत त्यांनी ती उलटण्यापासून वाचवली.
यानंतर पोलीस शिपाई दराडे आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान गणेश शिंदे यांच्या मदतीने रिक्षामध्ये अडकलेल्या दोन महिला प्रवासी आणि रिक्षाचालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
अपघातानंतर रिक्षाचालक आणि दोन्ही महिला प्रवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर रिक्षाचालक, प्रवासी आणि डंपरचालक आपापल्या मार्गाने रवाना झाले. मात्र, संभाव्य दुर्घटनेच्या वेळी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या धाडसाचे आणि कर्तव्यतत्परतेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.