पनवेल : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला घरात गळा दाबून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना पनवेल खांदेश्वर येथे घडली आहे. या प्रकरणी खून करणार्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रियकराचा शोध सुरू आहे. दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांदा कॉलनी येथे राहणारे विष्णू गवळी यांच्या पत्नीने हत्या केल्याची ही धक्कादायक घटना 9 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथे घडली. याप्रकरणी पत्नी अश्विनी विष्णू गवळी (वय 37) आणि समीर मोहन ठाकरे (वय 26 रा. नेरे) यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विष्णू गवळी यांची पत्नी अश्विनी आणि चालक समीर ठाकरे यांच्यात अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांवरून विष्णू गवळी यांनी केलेल्या विरोधाच्या कारणावरून आणि विष्णू गवळी यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःला मिळावी, या कारणावरून पत्नी अश्विनी गवळी हिने समीर मोहन ठाकरे याच्याशी संगनमत करून विष्णू गवळी यांना राहत्या घरात गळा दाबून ठार मारले.
या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात 11 ऑगस्ट रोजी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील आरोपी अश्विनी गवळी हिला अटक केली असल्याची माहिती दिली. विष्णू गवळी हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.