विक्रम बाबर
पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत मालमत्ता कर संकलनात १०० कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. महानगरपालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत असून ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या आवाहनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादामुळे आतापर्यंत एकूण ८३ हजार ५२ मालमत्ताधारकांनी १०२ कोटी रुपये मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य केले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पालिकेच्या कर संकलन विभागाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जून महिन्यातच १०० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ३१ जुलैपर्यंत मालमत्ता कर भरल्यास चालू मागणीवर ५ टक्के सवलत आहे.
पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार मालमत्ता धारकांसाठी विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे.. ३१ जुलै २०२६ पर्यंत मालमत्ता कर भरल्यास चालू मागणीवर ५ टक्के सवलत, तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त २ टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी वेळेत कर भरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मालमत्ता कराची देयके (बिले) तयार करण्यात आली असून त्यांचे वितरण युद्धपातळीवर सुरू आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेले बिल वितरक कर्मचारी कार्यक्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्था, सोसायट्या व संकुलांमध्ये बिल वाटप करत आहेत. संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक प्रवेश व सहकार्य करून वितरण मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना ऑनलाईन सुविधा
नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्ता कराचे बिल ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी www.panvelmc.org या संकेतस्थळावर किंवा “कर मित्र पीएमसी” मोबाईल ॲपद्वारे बिल प्राप्त करून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा वापरावी, असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे. आवश्यक असल्यास महानगरपालिका मुख्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयातूनही बिल उपलब्ध करून घेता येईल.