पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग समिती ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’च्या सभापतीपदासाठी महायुतीने चार उमेदवार रिंगणात उतरवले असून, यामुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
प्रभाग समिती ‘अ’च्या सभापतीपदासाठी रविंद्र अनंत भगत, ‘ब’च्या सभापतीपदासाठी मधु दौलतराव पाटील, ‘क’च्या सभापतीपदासाठी रविंद्र गणपत जोशी, तर ‘ड’च्या सभापतीपदासाठी अजय तुकाराम बहिरा यांनी महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
नामनिर्देशन अर्ज दाखल करताना महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक व नगरसेविकांची उपस्थिती होती. माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेशशेठ ठाकूर, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांच्यासह महायुतीचे नगरसेवक व नगरसेविका यावेळी उपस्थित होते.
पनवेल महापालिकेतील सत्तेच्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर चारही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक पातळीवरील विकासकामे, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभाग समित्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे या समित्यांच्या सभापतीपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२० प्रभागांची विभागणी चार समित्यांमध्ये
प्रभाग समिती 'अ' मध्ये प्रभाग क्र. १, २, ७, ८, १०
प्रभाग समिती 'ब' मध्ये प्रभाग क्र. ३, ४, ५, ६
प्रभाग समिती 'क' मध्ये प्रभाग क्र. ९, ११, १२, १३, १५
प्रभाग समिती 'ड' मध्ये प्रभाग क्र. १४, १६, १७, १८, १९ आणि २० चा समावेश आहे.