पनवेल : पनवेल महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांची पदावनती करण्यात आली असून, त्याबाबतचा आदेश जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग अधिसूचनेचा आधार घेऊन, पनवेल महानगरपालिकेने दिनांक २१ जून २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही कारवाई केली आहे.
महानगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक या पदासाठीच्या यादीत सात कर्मचारी पूर्वी कार्यरत होते, मात्र शासन निर्याणा नुसार त्यांच्या नियुक्ती व ज्येष्ठता प्रक्रियेत झालेल्या पुनर्रचनेतून काही तांत्रिक कारणांमुळे त्यांची पदावनती करण्यात आली आहे.
या आदेशानुसार पालिकेतील एकूण नऊ कर्मचाऱ्यांची पदावनती निश्चित करण्यात आली आहे त्या पैकी सात कर्मचारी यांना वरिष्ठ लिपिक पदावरून लिपिक (कनिष्ठ) या पदावर पदावनती देण्यात आली आहे. तर उर्वरित दोन कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षकपदी पदानवती देण्यात आली आहे. संबंधित आदेश शासन निर्णयाच्या अधीन असून, प्रशासनाने ही कारवाई सेवा नोंदवहीत नोंदविली आहे. या पदावनतीचा परिणाम संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीवरही होणार असून, त्यांच्या सेवाश्रेय व निवृत्ती दिनांकातही बदल होणार आहे. दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे, प्रशासनाच्या तपासणीत काही त्रुटी आढळल्याने आणि नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
महानगरपालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही पदावनती प्रक्रिया शासन नियमांनुसार पार पाडली गेली असून, कर्मचाऱ्यांना याबाबत लेखी आदेशही देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनातील ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे