पनवेल महापालिका Pudhari Photo
रायगड

Panvel Municipal Corporation | पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला..!

महानगरपालिकेकडून अधिकृत जाहिर सूचना प्रसिद्ध : प्रारुप यादी 17 रोजी प्रसिद्ध होणार

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या अनुषंगाने अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यासंदर्भात महानगरपालिकेने अधिकृत जाहिर सूचना प्रसिद्ध केली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, आरक्षण सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडणार आहे. या सोडतीचा कार्यक्रम आझादक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सर्वसाधारण नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना तसेच इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यानंतर, आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्याची तारीख सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी सोमवार, १७ नोव्हेंबर ते सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) अशी मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, मिळालेल्या सर्व हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. पनवेल शहरात येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, ही सोडत प्रक्रिया राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. विविध प्रभागांमध्ये कोणत्या प्रवर्गाला आरक्षण मिळणार, याकडे सर्वच पक्ष व संभाव्य उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT