पनवेल ः विक्रम बाबर
पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महानगरपालिकेने 55 मीटर व 28 मीटर उंचीपर्यंत कार्यक्षम अशा अत्याधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहनांची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पनवेल शहरात गेल्या काही वर्षांत वेगाने वाढ होत असून, लोकसंख्या वाढी बरोबरच गृहनिर्माण प्रकल्प, व्यापारी संकुले, मॉल्स, रुग्णालये, हॉटेल्स तसेच उद्योगक्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच उंच इमारती, हाई-राईज रेसिडेन्शियल टॉवर्स, कार्यालयीन संकुले मोठ्या प्रमाणावर उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना व इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
सद्यस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री मर्यादित असून, विशेषतः उंच इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना वाचवायचे असल्यास आवश्यक त्या उंचीपर्यंत पोहोचण्याकरिता आधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती.
55 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म हे उंच इमारतींमध्ये 15 ते 20 मजले व त्यापेक्षा जास्त उंचीवर पोहोचण्यासाठी उपयोगी ठरेल, तर 28 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म मध्यम उंचीच्या इमारती, गृहनिर्माण संकुले, रुग्णालये, शाळा, हॉटेल्स आदी ठिकाणी बचावकार्यासाठी उपयुक्त ठरेल.
शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी 22 कोटींची गुतवणूक
या खरेदी प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आल्या असून, तांत्रिक निकषांनुसार पात्र कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्ये, सुरक्षितता मानके, कार्यक्षमता व दीर्घकालीन देखभाल खर्च यांची सखोल तपासणी करून योग्य तो प्रस्ताव निवडण्यात येणार आहे.या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे 22 कोटींहून अधिक खर्च येणार असून, ही गुंतवणूक शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग अधिक सक्षम, आधुनिक आणि सुसज्ज होणार आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्या व उंच इमारतींशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज राहील.
आपत्ती प्रसंगी सत्वर प्रतिसाद
दोन आधुनिक लॅडर प्लॅटफॉर्ममुळे आपत्ती प्रसंगी सत्वर प्रतिसाद पुढील महत्त्वाची कामे अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार आहे. उंच इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे.अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षितपणे रेस्क्यू करणे,औद्योगिक व रहिवासी क्षेत्रातील दुर्घटनांमध्ये बचावकार्य करणे, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे ही कामे तत्काळ करणे शक्य होणार आहे.
नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण हीच महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी असून, त्या दृष्टीने पनवेल महानगरपालिका सातत्याने आधुनिक सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत आहे. 55 मीटर व 28 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची खरेदी हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे.मंगेश चितळे, आयुक्त तथा प्रशासक, पनवेल महानगरपालिका