Kamothe Minor Assault Case
पनवेल : कामोठे येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या बसचालकाने अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणाची भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांनी दखल घेतली. केवळ बसचालकाला अटक करून प्रकरण थांबवू नये, तर संबंधित शाळेचे संस्थापक आणि संचालक यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख तसेच पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या सहकारी संध्या शरबिद्री यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित शाळेच्या बसचालकाला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात चालकाची नियुक्ती आणि त्याच्या पडताळणीची प्रक्रियाही तपासणे आवश्यक असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. शाळेच्या बसवर काम करण्यासाठी संबंधित व्यक्तीची निवड करताना आवश्यक ती पार्श्वभूमी तपासणी करण्यात आली होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लहान मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पालकांची नसून शाळा व्यवस्थापनाचीही आहे. त्यामुळे चालकाची नियुक्ती करताना निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्यासाठी शाळेचे संस्थापक आणि संचालक यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी. दोष आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली.
‘बसचालकाला अटक झाली असली तरी केवळ एवढ्यावर आम्ही समाधानी नाही. अशा व्यक्तीला कामावर ठेवताना निष्काळजीपणा करणाऱ्या शाळा संस्थापक आणि संचालकांचीही चौकशी झाली पाहिजे. चिमुकल्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही,’ असा इशारा आमदार चित्रा वाघ यांनी दिला.