शासकिय अधिकाऱ्यांनी पूरस्थितीची पाहणी केली.  
रायगड

Panvel Heavy Rain | पनवेल तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान; तीन जणांचा मृत्यू, एकाचा शोध सुरू, ४५ घरांचे नुकसान

आपटा व डोलघर रस्ते पाण्याखाली; १५ प्रवाशांसह अडकलेली बस सुखरूप बाहेर, प्रशासन सतर्क

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून एका तरुणाचा शोध अद्याप सुरू आहे. तसेच तालुक्यातील अंदाजे ४५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून आपटा व डोलघर येथील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, पोलीस, अग्निशमन दल, ग्रामविकास विभाग आणि पनवेल महानगरपालिका संयुक्तपणे मदत व बचावकार्य राबवत असल्याची माहिती अपर तहसिलदार कार्यालयाने दिली.

मौजे आपटे येथील प्रज्वल प्रदीप कांबळे (वय १५) हा मुलगा ५ जुलैपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह रविवारी उरण तालुक्यात आढळून आला. तर दियाटी येथील मच्छिंद्र गणपत गावंड (वय ४०) हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. शोधमोहीमेदरम्यान त्यांना शोधून वशेणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

वाघाची वाडी परिसरात सुमित यशवंत पवार (वय २२) आणि नयन राम म्हात्रे (वय २३) हे दोघे पाण्यात वाहून गेले होते. बचाव पथकाने सुमित पवार याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नयन राम म्हात्रे यांचा शोध पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल विभागामार्फत सुरू आहे.

दरम्यान, आपटे येथे १५ प्रवाशांसह एक बस पाण्यात अडकली होती. प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. तसेच पनवेल महानगरपालिकेचे गावदेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील सुमारे ४५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून संबंधित पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपटा आणि डोलघर येथील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर अपर तहसिलदार जितेंद्र इंगळे आणि निवासी नायब तहसिलदार संभाजी शेलार यांनी पूरग्रस्त व संभाव्य धोकादायक भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT