अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये ४३५ नागरिकांचे स्थलांतर  pudhari photo
रायगड

Panvel heavy rain : अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये ४३५ नागरिकांचे स्थलांतर

महानगर पालिकेचे सर्व प्रशासन अलर्ट मोडवर

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून बाधित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आतापर्यंत सुमारे ४३५ नागरिकांचे चार तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांना चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अतिवृष्टीमुळे पाणी साचणाऱ्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत पनवेलमधील पटेल मोहल्ला व कच्ची मोहल्ला परिसरातील भारतनगर झोपडपट्टीतील १४९ नागरिकांना उर्दू शाळेत, २११ नागरिकांना कोळीवाडा शाळेत, तर एचओसी कॉलनी आदिवासी वाडीतील ७५ नागरिकांना क्रीडा संकुलात सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्यात आले आहे.

भांडार विभागामार्फत या सर्व नागरिकांना चहा, बिस्किटे, नाश्ता, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांच्या सूचनेनुसार स्थलांतरित नागरिकांरी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त, संबंधित उपायुक्त, कामोठे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, पनवेल प्रभाग प्रभारी अधिकारी राजेश डोंगरे तसेच मुख्य निरीक्षक अरुण कांबळे हे सातत्याने निवारा केंद्रांना भेट देऊन नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली.

महापौरांची पाहणी व नागरिकांना आवाहन

महापौर नितीन पाटील यांनी पनवेलमधील विविध पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली. यावेळी महापालिका सदस्य सुमित झुंजारराव व दर्शना भोईर उपस्थित होते. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाण्याचा निचरा तातडीने करण्याच्या सूचना देतानाच नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.

तसेच महापौरांनी स्थलांतरित शिबिरांना भेट देऊन, महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला, यावेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे,डॉ वैभव विधाते उपस्थित होते.

पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना

जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सखल भागातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जेटिंग मशिन व जेसीबीच्या सहाय्याने गटारांमधील अडथळे व कचरा हटविण्याचे काम सुरू असून विविध ठिकाणी पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत. चारही प्रभागातील परिस्थितीवर महापालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

प्रत्यक्ष पाहणी व आढावा

खारघर येथील ड्रायव्हिंग रेंज व पांडवकडा मार्ग सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. या परिसराची अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर आणि प्रभारी अधिकारी जितेंद्र मढवी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी पनवेलमधील बांठिया शाळा, पाणी साचलेले विविध भाग तसेच स्थलांतरित नागरिकांच्या निवारा केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच समिती ‘क’ अंतर्गत कामोठे गणपती मंदिर परिसरात दोन पंपांच्या साहाय्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे , नगरसेवक समीर ठाकूर यांनी नवीन पनवेल होल्डिंग पाॅण्डची पाहणी केली.

ऑनलाईन बैठकीत परिस्थितीचा आढावा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे आपत्कालीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी चारही प्रभागांतील पाणी साचलेली ठिकाणे, तेथील उपाययोजना, स्थलांतरित नागरिकांना पुरविण्यात आलेल्या सुविधा याबाबत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT