Panvel Crime | सरकारी नोकरीच्या आमिषाने ३१ लाखांचा गंडा; वसईच्या गटशिक्षण अधिकाऱ्याला अटक File Photo
रायगड

Panvel Crime | सरकारी नोकरीच्या आमिषाने ३१ लाखांचा गंडा; वसईच्या गटशिक्षण अधिकाऱ्याला अटक

बँकेत नोकरी लावल्याचा बनाव; पनवेल पोलिसांची कारवाई, साथीदाराचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : सरकारी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाकडून तब्बल ३१ लाख २७ हजार रुपये उकळल्याप्रकरणी वसई तालुक्यात गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या छत्तरसिंग राजपूत (रा. मुद्रे, कर्जत, जि. रायगड) याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील त्याचा कथित साथीदार अनिल कचरे याचाही पोलिस शोध घेत आहेत.

करंजाडे येथे वास्तव्यास असलेल्या परमेश्वर जाधव यांच्या मुलीला सरकारी बँकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन आरोपी राजपूत याने दिल्याचा आरोप आहे. त्यानुसार २०२३ पासून आतापर्यंत जाधव यांच्याकडून बँक व्यवहार तसेच रोख स्वरूपात तब्बल ३१ लाख २७ हजार रुपये घेण्यात आले.

नोकरी मिळणार असल्याच्या विश्वासाने जाधव यांच्या मुलीला गोरेगाव येथील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत प्रशिक्षणार्थी म्हणून कामावरही पाठविण्यात आले. मात्र, तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटूनही पगारवाढ किंवा अन्य कर्मचारी लाभ मिळत नसल्याने तिच्या मनात संशय निर्माण झाला. त्यानंतर जाधव कुटुंबीयांनी बँक ऑफ बडोद्याच्या वांद्रे येथील मुख्य शाखेत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या मुलीच्या नावाची कोणतीही व्यक्ती बँकेच्या कर्मचारी म्हणून कार्यरत नसल्याचे समोर आले.

ही बाब समोर आल्यानंतर परमेश्वर जाधव यांनी राजपूत याच्याकडे पैशांबाबत आणि नोकरीच्या स्थितीबाबत विचारणा केली. मात्र, त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत मेटे यांनी गुन्ह्याची नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक संजय अस्पतवार यांच्याकडे तपास सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी छत्तरसिंग राजपूत याला अटक केली.

दरम्यान, राजपूत हा वसई येथे गटशिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीवर नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच ३१ लाख २७ हजार रुपयांच्या व्यवहारामागील संपूर्ण आर्थिक साखळी काय आहे, याचा तपास पनवेल शहर पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT