पनवेल : दिवाळीच्या सणात संपूर्ण शहर उजळून निघालं असतानाच कामोठ्यातील सेक्टर ३५ मधील ‘प्रतीक जेम्स’ सोसायटी मध्ये मात्र गूढतेची सावली पडली आहे. कामोठ्यातील नावाजलेली आणि उच्चभ्रू मानली जाणारी सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच या सोसायटीत २५ तोळे सोन्याची चोरी झाल्याची घटना घडली होती, आणि त्या घटनेचा तपास अद्याप सुरु असतानाच आज पुन्हा एक विचित्र आणि अघोरी, जादूटोण्याचा घटनेने सोसायटी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ज्या सोसायटी मधील घरात चोरी झाला त्याच सोसायटी मध्ये हा अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे
आज सायंकाळी ४ वाजता सोसायटीच्या ‘पर्ल’ इमारतीच्या १३व्या मजल्यावर एका लाल रंगाच्या फडक्यात गुंडाळलेली, पिठाच्या गोळ्याने बनवलेली विचित्र प्रतिकृती इमारती मध्ये राहणाऱ्या एका रहिवाशीयला दिसून आले आहे. ही वस्तू पाहताच परिसरातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. काहींनी याला “जादूटोणा” किंवा “भानुमतीचा प्रकार” असल्याचे म्हटले असून, सोशल मीडियावरही या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या मजल्यावर ही प्रतिकृती ठेवलेली आढळली, त्याच मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये काही दिवसांपूर्वीच २५ लाखाच्या सोन्याची चोरी झाली होती. त्यामुळे या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याची चर्चा सध्या सोसायटीत जोरात सुरू आहे. रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, काहींनी हे कृत्य कुणाच्यातरी धाक दाखविण्याचा किंवा अंधश्रद्धेमुळे केलेला प्रकार असावा, असा अंदाज वर्तवला आहे. या प्रकरणाबाबत एका रहिवाशाने सांगितले, “आमच्या सोसायटीत अशा प्रकारच्या घटना आधी कधी घडल्या नव्हत्या. आधीच सोन्याची चोरी झाली आणि आता हा विचित्र प्रकार दिसतोय. त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत.”
प्रतीक जेम्ससारख्या प्रतिष्ठित आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत अशा घटना घडू लागल्याने परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीनंतर लगेचच जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. रहिवासी मात्र तपासाच्या निष्कर्षाकडे आणि सुरक्षा व्यवस्थेच्या वाढीव उपायांकडे आता आशेने पाहत आहेत.