पनवेल : शाळेत शिक्षिकेने दिलेल्या 'गुड टच आणि बॅड टच'च्या माहितीमुळे एका नराधमाचे संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे. तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी आरोपी पंकज अजयसिंग सिंग (२८, रा. कामोठे, सेक्टर १५) याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात ४ मे रोजी 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुली ६, ७ आणि ९ वर्षांच्या आहेत. आरोपी पंकज सिंग याने या तिन्ही चिमुरड्यांची छेड काढून त्यांचा विनयभंग केला होता. या घटनेमुळे मुली घाबरलेल्या होत्या. दरम्यान, शाळेत एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सुरक्षित स्पर्श (Good Touch) आणि असुरक्षित स्पर्श (Bad Touch) याबद्दल मार्गदर्शन केले. हे धडे गिरवत असताना, एका पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेल्या 'बॅड टच'च्या प्रकाराची माहिती शिक्षिकेला दिली. मुलींनी घडलेला प्रकार शिक्षिकेला सांगितल्यानंतर ही बाब तात्काळ पालकांच्या कानावर घालण्यात आली. आपल्या पोटच्या गोळ्यांसोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांनी संताप व्यक्त केला आणि तातडीने कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
आरोपीला अटक
पालकांच्या तक्रारीवरून कामोठे पोलिसांनी आरोपी पंकज अजयसिंग सिंग विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत नराधम पंकजला अटक केली आहे. शिक्षिकेने योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.