पनवेल महापालिका मुख्यालयातील जनरेटरला अचानक आग  
रायगड

Panvel Corporation fire | पनवेल महापालिका मुख्यालयातील जनरेटरला अचानक आग : धुराचे प्रचंड लोट

प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला : संपूर्ण मुख्यालयात गोंधळाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

पनवेल प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज (दि. ९ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोठी खळबळ उडवणारी घटना घडली. पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर वीजपुरवठ्यासाठी ठेवलेल्या बॅकअप जनरेटरला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही काळासाठी संपूर्ण मुख्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. धुराचे प्रचंड लोट वरच्या मजल्यापर्यंत पसरल्याने कर्मचारी आणि अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने पालिकेच्या अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

मुख्यालयाच्या अगदी शेजारीच असलेल्या पालिका अग्निशमन विभागाच्या जवानांनी काही क्षणांतच घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याच्या फवाऱ्यांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रयत्नांनंतर ही आग पूर्णतः विझवण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु जनरेटर आणि त्याच्याजवळील काही उपकरणांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

आग लागल्यानंतर तत्काळ मुख्यालयातील सर्व कर्मचारी बाहेर पडले, तर सुरक्षारक्षकांनी परिसर रिकामा केला. प्रशासनाने अग्निशमन विभागासोबत मिळून आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे, जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT