Panvel Water Shortage Pudhari
रायगड

Panvel Water Shortage: भर पावसाळ्यात पोलीस ठाण्याला टँकरचा आधार; महापालिकेच्या जलवाहिनीतून अपुरा पाणीपुरवठा

कर्मचारी वर्गाची पाण्यासाठी कसरत

पुढारी वृत्तसेवा

राजेश डांगळे

खांदा कॉलनी: एकीकडे पावसाळा जोरात सुरू असताना दुसरीकडे पनवेल शहर पोलिस ठाण्याला दररोज पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून पोलिस ठाण्याला होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने तेथील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्याची स्थिती आहे.

पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते.

मात्र, महापालिकेच्या पाइपलाइनमधून अपेक्षित प्रमाणात पाणी येत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, पाण्याची टाकी भरण्यासाठी दररोज टँकर मागविण्याची वेळ पोलिस प्रशासनावर आली आहे.

भर पावसाळ्यात पोलिस ठाण्याला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिस ठाण्यात अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचीही मोठी वर्दळ असते.

त्यामुळे उपलब्ध पाण्यावर मोठा ताण पडत आहे. पाण्याची कमतरता असल्याने पोलिस कर्मचारी वर्गालाही दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिस ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे.

मात्र, जलवाहिनीतील अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यातही पाण्यासाठी टँकर मागवावा लागत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जलवाहिनीची पाहणी करून नेमकी अडचण दूर करण्याची मागणी पोलिस कर्मचारी वर्गाकडून होत आहे. पोलिस ठाण्याची पाण्याची टाकी नियमित भरली जाईल, अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. पोलिस कर्मचारी दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतात.

त्यांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनानेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठ्याची समस्या सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT