पनवेल : शासकीय निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना खारघर येथे उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे मंत्रालयातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणातील आरोपी लोकसेवक विलास ज्ञानोबा लाड कक्ष अधिकारी, वर्ग १, मंत्रालय, मुंबई याने गावातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मंजूर होणाऱ्या शासकीय निधीसाठी तक्रारदाराकडे मोठी रक्कम लाचेची मागणी केली होती. संबंधित गावाच्या सरपंचांनी तक्रारदाराला अधिकारपत्र देऊन निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार तक्रारदार मंत्रालयात वारंवार पाठपुरावा करत होते.
दरम्यान, २५/१५ योजना व अल्पसंख्याक योजनेअंतर्गत निधी मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे थेट ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. ही रक्कम देण्यास तक्रारदाराने नकार देत ९ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत विभागाने १६ मार्च रोजी पडताळणी केली असता, आरोपी अधिकाऱ्याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच ही रक्कम स्वीकारण्यासही तो तयार असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला.
५ एप्रिल २०२६ रोजी खारघर, खारघर येथे सापळा राबवण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला ६.३७ लाख रुपयांची रक्कम दिली असता, लाड याने ती स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई च्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी केले, तर पोलीस निरीक्षक सागर आरगडे यांनी पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडली. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अजित मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.