Palsdari Dam Pudhari
रायगड

Palsdari Dam: पळसदरी डॅममध्ये आढळला अज्ञात तरुणीचा मृतदेह

कर्जतमध्ये खळबळ; आत्महत्या की घातपात? कर्जत पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : कर्जत शहरानजीक असलेल्या पळसदरी डॅम परिसरात रविवार (15 फेब्रुवारी) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघातग्रस्त हेल्प फाउंडेशन यांच्या पथकानेही मदतकार्य करत मृतदेह तलावातून बाहेर काढला.

मृत तरुणीचे वय अंदाजे 22 ते 24 वर्षे असून ती अविवाहित असल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. मात्र तिची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

ही घटना आत्महत्येची आहे की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मात्र नेमके कारण काय आहे, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तौसिस सय्यद, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले तसेच पोलीस हवालदार जयवंत काटे यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, संबंधित तरुणी जवळील पळसदरी रेल्वे स्थानकातून येथे आली असावी का, अथवा अन्य कोणत्या कारणाने या भागात दाखल झाली होती, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT