Pali Nagarpanchayat Election Pudhari
रायगड

Pali Nagarpanchayat Election: पाली न.पं. पोटनिवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय; प्रभाग १३ मध्ये स्वप्नाली जाधव विजयी

शेकाप-भाजपा-राष्ट्रवादी आघाडीला चारली धूळ

पुढारी वृत्तसेवा

संदेश उतेकर

पाली: पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शेकाप, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी थेट लढत पाहायला मिळाली. मात्र, मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपले मत टाकत 'एकला चलो रे'ची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला एकहाती विजय मिळवून दिला आहे.

प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार स्वप्नाली विनायक जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सुधीर साखरले यांचा २४ मतांनी पराभव केला. शेकापच्या उमेदवाराला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही जागा जिंकणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. मात्र, स्वप्नाली जाधव यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावत विजयाचा गुलाल उधळला.

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाली शहरात एकच जल्लोष केला. चौकाचौकात फटाके वाजवून आणि शिवसेनेच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. विजयाची घोषणा होताच नवनिर्वाचित उमेदवारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

सर्वप्रथम विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच सर्वप्रथम श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन पाली शहरातून विजयी मिरवणूक काढून श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी बल्लाळेश्वर देवस्थानच्यावतीने नवनिर्वाचित नगरसेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सुनंदा पाटील बिनविरोध

दुसरीकडे, प्रभाग क्रमांक १४ मधून शिवसेनेच्या सुनंदा निशिकांत पाटील या आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे दोन जागांसाठी झालेल्या या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भगवा फडकवून शिवसेनेने पाली नगरपंचायतीत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT