Pali crematorium pudhari photo
रायगड

Pali crematorium : पाली स्मशानभूमीची दुरवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय

अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबीयांची पावसात प्रचंड गैरसोय; नवीन सर्वसुविधायुक्त स्मशानभूमीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

रायगड : शरद निकुंभ

पाली बसस्थानकाजवळ अंबा नदीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे स्थानिक प्रशासन व नगरपंचायतीचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्मशानभूमीच्या मुख्य शेडवरील पत्रे जागोजागी तुटून लोंबकळत आहेत. शेडला आधार देणारे लोखंडी खांब पूर्णपणे गंजले असून ते कधीही कोसळू शकतात. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

शेडचे पत्रे तुटल्यामुळे पावसाचे पाणी थेट चितास्थळावर पडत असून, अंत्यसंस्काराची प्रक्रिया अत्यंत अडचणीत पार पडते. दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या नातेवाईकांना पावसात उभे राहून अंत्यविधी करावे लागत असल्याने त्यांची मोठी मानसिक व शारीरिक गैरसोय होत आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्ता अनेक ठिकाणी खचला असून अंबा नदीलगतच्या ओहळाचे पाणी वाढल्यास आणखी माती वाहून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे अंत्ययात्रेसह येणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे.

अंबा नदीच्या काठी असलेली ही स्मशानभूमी आज "मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मरणानंतरही यातना" देणारी ठरत असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पालीची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्याची स्मशानभूमी अपुरी व गैरसोयीची असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देत आधुनिक आणि सर्वसुविधायुक्त स्मशानभूमी उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. एकाच वेळी किमान दोन ते तीन अंत्यसंस्कार करता येतील अशी प्रशस्त व्यवस्था, सुरक्षित व मजबूत शेड, बसण्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, लाकडांचा कायमस्वरूपी साठा, अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते, रस्त्यालगत व परिसरात प्रकाशयोजना, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT