रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: रोजगाराच्या निमित्ताने खाडीपट्टा भागातील स्थलांतरित झालेल्या शेकडो खाडीपट्टावासीयांना सध्या प्रवासाच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत घरांचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेकांनी पश्चिम रेल्वेवरील पालघर ते डहाणू या भागात आपले वास्तव्य हलवले आहे.
मात्र, या भागातून कोकणात ये-जा करण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मध्य रेल्वेचे दादर, पनवेल किंवा दिवा स्थानक गाठावे लागते. मुख्यत्वे वसई, नालासोपारा, विरार, पालघर-डहाणू या पट्टयातील शेकडो प्रवासी पनवेल स्थानकातून जोडणाऱ्या गाड्यांचा वापर करतात. मात्र योग्य समन्वयाच्या अभावामुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा वाया जात आहे.
गावाहून परतताना महाड, सापे-वामने, विन्हेरे आणि वीर परिसरातील प्रवासी प्रामुख्याने ५०१०६ 'सावंतवाडी रोड - दिवा पॅसेंजर' या गाडीवर अवलंबून असतात. वेळापत्रकानुसार ही गाडी सायंकाळी ७:०५ वाजता पनवेल, तर ८:१० च्या सुमारास दिव्याला पोहोचणे अपेक्षित असते.
मात्र, कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावरील तांत्रिक अडचणी आणि गाड्यांच्या क्रॉसिंगमुळे ही ट्रेन बहुतांश वेळा तासनतास उशिराने धावते. सावंतवाडी पॅसेंजर वेळेत न पोहोचल्याने पनवेलवरून पश्चिम भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पुढील सर्व नियोजित रेल्वे कनेक्शन पूर्णपणे विस्कळीत होते.
दुसरीकडे, मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी ६९१६१ 'पनवेल - डहाणू रोड मेमू' ही गाडी पनवेल स्थानकातून सायंकाळी ६:५० वाजता सुटते. म्हणजेच वेळापत्रकानुसार ही मेमू सावंतवाडी पॅसेंजर पनवेलला पोहोचण्याच्या १५ मिनिटे आधीच निघून जाते; त्यातच पॅसेंजरच्या नेहमीच्या विलंबामुळे डहाणूकडे जाणाऱ्या चाकरमानी, स्थानिक व कौटुंबिक प्रवाशांची ही एकमेव सोयीची गाडी हमखास चुकते.
परिणामी, प्रवाशांना दिव्याहून दादर, किंवा पनवेल-कुर्ला-दादर असा ३ ते ४ टप्प्यांत लोकलचा वळसा घालावा लागतो. हाताशी सामान, वृद्ध आणि लहान मुले असताना ऐन गर्दीत लोकल बदलताना प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे पाहायला मिळते.
या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ही गाडी पनवेलला आल्यानंतरच 'पनवेल - डहाणू रोड मेमू' गाडी सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे. मध्य, पश्चिम तसेच कोकण रेल्वेने आपापसातील समन्वय वाढवून ६९१६१ पनवेल-डहाणू मेमूच्या वेळेत १५ ते २० मिनिटांचा बदल करावा, तसेच दिवा स्थानकातून पालघर-डहाणूसाठी अतिरिक्त मेमू फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. आता रेल्वे प्रशासन या मागणीची दखल कधी घेणार, याकडे खाडीपट्टावासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रवाशांची मागणी आणि वस्तुस्थिती
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर (५०१०६) ही गाडी ६१६ किलोमीटरचा प्रवास करत एकूण ४९ स्थानकांवर थांबते आणि तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश वेळा उशिराने धावते. दुसरीकडे, ६९१६१ पनवेल-डहाणू रोड मेमू ही गाडी सायंकाळी ६:५० वाजता सुटून २० स्थानकांवर सेवा देते. या दोन्ही गाड्यांच्या वेळेत ताळमेळ नसल्याने आणि पॅसेंजरच्या विलंबामुळे महाड, वीर, विन्हेरेसह पालघर जिल्ह्यातील प्रवाशांची ही मेमू चुकते.
त्यामुळे सावंतवाडी पॅसेंजर पनवेलला पोहोचल्यानंतरच (किंवा तिच्या वेळेनुसार मेमूची वेळ १५-२० मिनिटे पुढे ढकलून) 'पनवेल-डहाणू मेमू' सोडण्यात यावी आणि दिवा व पनवेल स्थानकातून पालघर-डहाणूसाठी अतिरिक्त मेमू फेऱ्या तातडीने सुरू करणे अपेक्षित असल्याची मागणी खाडीपट्टावासीयांची आहे.
एक तर डहाणू मेमूची वेळ सावंतवाडी पॅसेंजर पनवेलला पोहोचण्याच्या १५ मिनिटे आधीची आहे, त्यात पॅसेंजर उशिरा आल्यास संपूर्ण कुटुंबासह दादर-कुर्ला मार्गे वळसा घालत घरी जाण्यास मध्यरात्र होते. रेल्वे प्रशासनाने केवळ १५ ते २० मिनिटे मेमूची वेळ पुढे ढकलल्यास किंवा दोन्ही गाड्यांच्या वेळेत मेळ घातल्यास हजारो प्रवासी व नोकरदारांचा हा रोजचा मनस्ताप कायमचा टळू शकतो.बबन धाडवे, प्रवासी-नालासोपारा