नेवाळी : कल्याण शीळ रोडवरील सात वर्षांपासून सुरु असलेल्या पलावा पुलाचे शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर त्यावर दोन दुचाकीस्वारांचे अपघात झाले होते. हे अपघात म्हणजे निष्काळजीपणा आणि राजकीय गाफीलपणा आहे. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढा देणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कल्याण परिमंडळ - 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत त्यांनी निष्काळजी पणा करणार्यां विरोधात गुन्हे दाखल करावे असे निवेदन दिले आहे. पोलीस उपायुक्तांनी याची सखोल चौकशी करू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे.
कल्याण-शीळ रोडवर देसाई खाडी ते काटई नाका अशी नवीन पलावा पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाचे शिवसेना शिंदे गटाने उद्घाटन करत पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र काही वेळातच या पुलावर अपघात झाले आणि पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या अपघातावरून विरोधी पक्षांनी शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला धारेवर धरले आहे. समाज माध्यमातून देखील यावर जोरदार टीका होत आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे व त्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुलाचे काम अपूर्ण असूनही श्रेयवादासाठी उद्घाटनाचा सोहळा पार पाडण्यात आला. पुलाचा रस्ता निसरडा असून त्यामुळे अपघात घडले आहेत. संबंधित अधिकारी, बांधकाम कंत्राटदार आणि सत्ताधारी पदाधिकारी यांनी निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीविताला धोका पोहचवला आहे.
जर काम पूर्ण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले गेले असेल, तर त्यावरदेखील कंत्राटदारावर गुन्हा दाखल व्हावा, अशी स्पष्ट भूमिका निवेदनात घेण्यात आली आहे.या गंभीर प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांकडे याचा पाठपुरावा करण्याची मागणी केली. जिल्हाप्रमुख म्हात्रे म्हणाले, हा अपघात साधा नाही. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढा देणार आहोत.पोलीस उपायुक्त झेंडे यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती म्हात्रेंनी दिली आहे.