अलिबाग : सुवर्णा दिवेकर
राज्य सरकारच्या एक रूपयात पीकविमा योजनेला रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे. मात्र अनेक कारणांमुळे शेतकर्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाही. जिल्ह्यात 61 हजार 834 शेतकर्यांनी योजनेस प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्ष 4 हजार 115 शेतकर्यांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. मात्र खरीप हंगामाच्या तुलनेत फळपीक विमा योजनेत बागायतदारांना मोठा लाभ मिळाल्याचे दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्य सरकारने एक रूपयात पीक विमा देण्याची घोषणा केली. 2023-24 च्या खरीप हंगामात ही योजना सुरू झाली. त्यापूर्वी रायगड जिल्हयातील शेतकरी पीकविमा काढण्यात फारसा रस दाखवत नव्हते. मात्र एक रूपयात पीकविमा योजना जाहीर झाल्यानंतर विमा घेणार्या शेतकर्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली. सन 2022-23 च्या खरीप हंगामात 7 हजार 890 शेतकर्यांनी पीकविमा घेतला होता. तर 2023-24 मध्ये शेतकर्यांचा उदंड प्रतिसाद मिळून हा आकडा 61 हजार 834 वर पोहोचला. मात्र प्रत्यक्षात केवळ 4 हजार 115 शेतकर्यांनाच याचा लाभ झाला.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्याचा लाभ मिळवण्यात मागे असल्याचे दिसून येते त्याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. ई-पीक पाहणी केली नसल्यामुळे योजनेत समाविष्ट असलेले पीक आणि नोंदवलेले पीक याच्यात तफावत आढळते. नुकसानीची माहिती वेळेवर दिली जात नाही. अनेकदा शेतकर्यांचे बँक खाते आधार लिंक नसते. त्यामुळे विम्याचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. विम्याची नोंदणी वेळेवर केली जात नाही. बँक खात्याची ई केवायसी झालेली नसते. कधी कधी झालेले नुकसान निकषात बसत नाही. अशावेळी शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित रहात असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र 83 हजार 222 हेक्टर इतके आहे. पीएम किसान योजनेसाठी पीकविम्याची जबाबदारी चोलोमंडल जनरल इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आली आहे. तर फळपीक योजनेसाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आहे. शेतकरयांनी वेळेत विमा संरक्षणासाठीचा अर्ज भरावा, ई पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी, नुकसानीची माहिती विमा कंपनीला वेळेवर कळवावी, आधार बँक खाते लिंक आहे का याची खात्री करावी नसल्यास करून घ्यावी. बँकेत जावून ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हयात खरीप हंगामात भात व नाचणी तर फळपीकांमध्ये आंबा आणि काजू पिकाला विम्याचा लाभ दिला जातो. यात प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी किंवा उगवण झाली नाही तर विम्याचा लाभ मिळतो. हंगामातील प्रतिकूल परीस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान झाले तर पीकविम्याचा लाभ मिळू शकतो.
नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे हे 72 तासात होणे आवश्यक आहे. मात्र आपल्याकडील शेतकरी ही नुकसान झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी येतात त्यामुळे त्यांना त्याचा लाभ देता येत नाही. कृषी विभाग विमा कंपनी यापैकी कोणाकडेही संपर्क करावा जेणे करून विम्याची रक्कम त्यांना मिळेल.वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक, रायगड