श्रीकृष्ण बाळ
महाड: रायगड किल्ल्याला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळदर्जाप्राप्त झाल्या नंतर किल्ले रायगड परिसरातील अनधिकृत बांधकामदारांना महाड तहसीलदार कार्यालयामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्या नंतर किल्ले रायगड परिसरातील 200 मीटर परिघांमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास सक्षम नियोजन अधिकाऱ्यांंची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाचे उल्घन करुन रायगड किल्ला परिसरात विनापरवाना आणि बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे या निमीत्ताने समोर आले आहे.
रायगड किल्ल्याच्या परिघात वारेमाप खासगीरित्या उत्खनन केले जात आहे. परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू जमिनीखाली दडल्या आहेत. तर अनेक वास्तू परिसरात आजही उजेडात आलेल्या नाहीत. यामुळे या परिसरात उत्खनन करताना पुरातत्व किंवा संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
याबाबत अद्याप कोणतीच ठोस भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. याबाबत स्थानिक किंवा जिल्हा स्तरीय प्रशासन देखील कुचकामी ठरत आहे. स्थानिक महसूल विभागाने केवळ अनधिकृत बांधकामदारांना नोटीसा बजावण्याचे काम केले आहे.
रायगड किल्ला परिसरातील छत्री निजामपूर ग्रामपंचायत अंतर्गत हिरकणी वाडी परिसरात तब्बल 42 अनधिकृत बांधकामदारांना तर पाचाडपरिसरातील 6 बांधकामदारांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र या नोटीसा देवून न थांबता स्थानिक महसूल प्रशासनाने या संदर्भात कार्यवाही करावी अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
रायगड किल्ला परिसरातील हिरकणी वाडी व पाचाड इथे अनधिकृत व्यावसायिक स्वरूपाची जी बांधकामे झाली आहेत, ती बांधकामे करणारे समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती असून त्यांची बांधकामे अनधिकृत स्वरूपाची असताना त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाने दाखवणे आवश्यक आहे.
अन्यथा अनधिकृत बांधकामामुळे किल्ले रायगडला युनेस्को कडून मिळालेला दर्जा गमावण्याची वेळ महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे येईल. ही वेळ येऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावेअशी मागणी होत आहे.