Electricity Pudhari
रायगड

Nizampur Power Cut: वीज बिल वेळेवर भरूनही सुरळीत वीज मिळेना! निजामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका; नागरिकही हैराण

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: निजामपूर परिसरात कमी-जास्त दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सततच्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे विद्युत उपकरणे खराब होण्याची भीती निर्माण झाली असून, काही उपकरणांचे नुकसानही होत आहे.

दुकानदार, लघुव्यावसायिक आणि अन्य व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच सण-उत्सवांचे दिवस सुरू असताना वीज वितरण व्यवस्थेतील या अनागोंदीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निजामपूर परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नेमका बिघाड कुठे झाला, वीज कधी पूर्ववत होणार आणि त्यासाठी कोणाशी संपर्क साधावा, याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे वीज समस्येबरोबरच तक्रारींचे निराकरण करण्यासाठीही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज बिल वेळेत न भरल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वीज वितरण कंपनी तत्पर असते.

मात्र, ग्राहकांना नियमित आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या बाबतीत ही तत्परता का दिसत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्राहकांनी बिल भरायचे, पण त्याबदल्यात मिळणाऱ्या वीजसेवेची खात्री कोण देणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यास निजामपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो.

मात्र, त्यांचा दूरध्वनी बंद असल्याचे आढळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे दूरध्वनीही बंद असल्यास तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण होतो.

वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असताना तक्रारींच्या वेळी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे.

निजामपूर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहक कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधतात. त्यावेळी कांदळगाव सबस्टेशनवरून वीजपुरवठा बंद झाल्याचे सांगितले जाते. मात्र, सबस्टेशनशी संपर्क साधल्यानंतर निजामपूर वीज मंडळाच्या कार्यालयाकडे निर्देश केला जात असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे.

अशा प्रकारे एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याने वीज का गेली आणि ती पूर्ववत कधी होणार, याचे ठोस उत्तर ग्राहकांना मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे ग्राहकांना केवळ वीजपुरवठ्याच्या समस्येलाच सामोरे जावे लागत नाही, तर संबंधित यंत्रणांकडून योग्य माहिती मिळवण्यासाठीही धावपळ करावी लागत आहे.

तक्रारींसाठी संपर्क क्रमांक कार्यरत ठेवणे, वीजपुरवठा बंद होण्याची कारणे स्पष्ट करणे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याचा संभाव्य कालावधी ग्राहकांना कळविणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. निजामपूर परिसराला कुडली फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. मात्र, या फिडरवर वारंवार बिघाड होत असल्याने वीजपुरवठ्याच्या स्थिरतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, माणगाव फिडरवरून वीजपुरवठा घेतल्यास तो तुलनेने सुरळीत चालत असल्याचा अनुभव नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कुडली फिडरवरील तांत्रिक अडचणी नेमक्या कोणत्या आहेत, त्यावर काय उपाययोजना करता येतील आणि पर्यायी वीजपुरवठ्याची शक्यता आहे का, याची तांत्रिक तपासणी करण्याची गरज आहे.

सध्या सण-उत्सवांचे दिवस सुरू असल्याने घरगुती ग्राहकांबरोबरच दुकानदार, व्यावसायिक आणि विविध सेवा पुरविणाऱ्या घटकांसाठी अखंडित व स्थिर वीजपुरवठा महत्त्वाचा आहे. मात्र, कमी-जास्त दाब आणि वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे नागरिकांना आर्थिक नुकसान व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन कुडली फिडरची तांत्रिक तपासणी करावी, कमी-जास्त दाबाच्या समस्येवर उपाययोजना कराव्यात आणि रात्रीच्या वेळीही तक्रारींसाठी जबाबदार अधिकारी उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वीज बिलाच्या वसुलीप्रमाणेच ग्राहकांना दर्जेदार वीजसेवा देण्याची जबाबदारीही वीज वितरण कंपनीने पार पाडावी. निजामपूर परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT