Raigad Development Plan pudhari photo
रायगड

Raigad Development Plan : 'आय झोन'मुळे निजामपूरच्या विकासाला खीळ; नागरिकांमध्ये असंतोष

‘आर झोन’द्वारे विकासाची दुसरी बाजू लक्षात घेण्याच्या मागणीला जोर

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : कमलाकर होवाळ

माणगाव तालुक्यातील निजामपूर परिसराच्या विकास आराखड्यात ‘आय (इंडस्ट्रीयल) झोन’ ऐवजी ‘आर (रेसिडेंसियल) झोन’ चा समावेश करावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा आक्रमकपणे लावून धरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांच्याकडे निवेदने देऊन नागरिकांनी ‘आय झोन’ नको, ‘आर झोन’ द्या, अशी मागणी केली आहे.

४० वर्षेपासून निजामपूरला आय झोन टाकला असल्याने गेली दहा दशके मागे निजामपूर विकासापासून दूर फेकला गेला आहे. त्यामुळे विकासाला चांगलीच खेळ बसली आहे. मात्र, या प्रश्नावर लोकप्रतिनिधीतून अद्याप ठोस निर्णय अथवा स्पष्ट भूमिका पुढे न आल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

निजामपूर परिसराचा झपाट्याने विस्तार होत असताना येथील जमीन वापराचे नियोजन हा भविष्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. स्थानिक नागरिकांच्या घरांच्या गरजा, वाढती लोकसंख्या, नव्या पिढीचे स्थायिक होणे आणि परिसरात निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी लक्षात घेता निवासी क्षेत्रासाठी अधिक जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या मते, ‘आर झोन’ उपलब्ध झाल्यास निवासी बांधकामाला नियोजनबद्ध स्वरूप मिळू शकते. जमीन निवासी वापरासाठी उपलब्ध झाल्याने अधिकृत बांधकाम, घरकुल निर्मिती आणि निवासी वसाहतींच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच जमीन ‘एनए’ करण्याची प्रक्रिया सुलभ होऊन मालमत्तेचा आर्थिक वापर वाढू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय नियोजनबद्ध टाऊन प्लॅनिंगला चालना मिळाल्यास रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, वीज, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा यांचे भविष्यातील नियोजन करता येऊ शकते. निवासी क्षेत्राचा विस्तार झाल्यास राष्ट्रीयीकृत बँका व इतर वित्तीय संस्था कडून पात्रते नुसार गृहकर्ज किंवा मालमत्तेशी संबंधित कर्ज सुविधा मिळण्याच्या शक्यता वाढू शकतात. त्यामुळे स्थानिकांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्या सोबतच जमिनीच्या आर्थिक वापरालाही चालना मिळू शकते.

'आर झोन’ च्या माध्यमातून निजामपूर परिसराचा विस्तार नियोजनबद्ध पद्धतीने झाल्यास बाहेरील बिल्डर, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार येथे येण्याची शक्यता आहे. त्यातून बांधकाम व्यवसाय, दुकाने, सेवा उद्योग, लघुउद्योग, कार्यालये तसेच विविध व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळू शकते. परिणामी स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे निवेदने देऊन ‘आय झोन’मध्ये बदल करून ‘आर झोन’ करण्याची मागणी केली आहे. मात्र, या मागणीवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री ना. अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी निजामपूरच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून नागरिकांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निजामपूरच्या विकासाचा प्रश्न हा केवळ एका झोनचा प्रश्न नसून पुढील अनेक दशकांच्या नागरी विकासाचा प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून, प्रत्यक्ष परिस्थितीचा सर्वेक्षणात्मक अभ्यास करून आणि भविष्यातील लोकसंख्या व पायाभूत सुविधांचा विचार करून विकास आराखड्यात योग्य बदल करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT