वैभववाडी : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा करूळ महत्वाचा घाट मार्ग आहे. गेले वर्षभर घाट बंद असल्यामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. या घाट रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र जनतेची सुरक्षितात ही तितकीच महत्वाची आहे. यासाठी 10 जानेवारीला आपण स्वतः परत एकदा या घाटरस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता व अधिकार्यांसमेवत पाहणी करू. त्यांनतर 15 जानेवारी पासून या घाट मार्गातून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात बाबत विचार करता येईल, असे मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
मंत्री नीतेश राणे यांनी शनिवारी (दि.28) दुपारी करूळ घाट मार्गाची पाहणी केली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांतधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता घाटगे, उपभियंता अतुल शिवनिवार, ठेकेदार ओमकार वेल्हाळ, चेतन वेल्हाळ, मिलिंद वेल्हाळ,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे,अरविंद रावराणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. राणे म्हणाले, करूळ घाटाचे काम गेले वर्षभर सुरु आहे. हा घाट बंद असल्यामुळे सर्वांचं त्रास सहन करावा लागत आहे. मात्र कोणतेही चांगले काम करताना थोडा त्रास सहन करावा लागतो. त्याप्रमाणे आमच्या जनतेने त्रास, नुकसान सहन केले आहे. आम्ही त्रास सहन केला, परंतु काम चांगले झाले असे जनतेला वाटले पाहिजे. विरोधक टीका करतात म्हणून घाट सुरु करण्याची घाईगडबडं करून जनतेच्या जीवाशी आम्ही खेळणार नाही. ज्या ठिकाणी रस्ता अरुंद आह किंवा संरक्षक भिंती अपूर्ण आहेत. दरीकडच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची कामे आधी पूर्ण करा. जोपर्यंत रस्ता वाहतूकसाठी शंभर टक्के सुरक्षित होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरु करता येणार नाही. 15 जानेवारी पासून वाहतूक सुरु करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विचार करीत आहे. त्या अगोदर आम्ही जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार अशी संयुक्त पाहणी करून निर्णय घेऊ, असे ना. राणे म्हणाले. कामात दिरंगाई केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अधिकार्यांना कामाबाबत अनेक सूचना केल्या. तसेच एक दोन ठिकाणी नवीन रस्ता वाहतूक सुरु करण्या अगोदर उखाडला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. जर रस्ता खराब झाला असेल तर तो करून घेण्यात येईल, असे सांगितले.