Pudhari Impact Pudhari
रायगड

Pudhari Impact: ‘विषारी‌’ बनलेल्या डीपीएस तलाव स्वच्छतेस सुरुवात

मँग्रोव्ह सेलकडून 2.5 टन शेवाळ उपसले; ‌‘ऑपरेशन फ्लेमिंगो लेक‌’ युद्धपातळीवर

पुढारी वृत्तसेवा

उरण: नवी मुंबईतील फ्लेमिंगोचे हक्काचे ठिकाण असलेल्या नेरूळ येथील डीपीएस तलावाच्या दुरवस्थेबाबत दै‌‘पुढारी‌’ने प्रसिद्ध केलेल्या सडेतोड बातमीची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे.

या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला असून, मँग्रोव्ह सेलने तातडीने ‌‘ऑपरेशन डीपीएस फ्लेमिंगो लेक क्लीनअप‌’ हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसांत या तलावातून तब्बल 2.5 टनांहून अधिक घातक शेवाळ आणि गाळ बाहेर काढण्यात आला आहे.

प्रशासनाच्या या कृतीचे स्वागत होत असले तरी, पर्यावरणवाद्यांनी मुळातील समस्येकडे लक्ष वेधले आहे. नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, “नुसते शेवाळ काढून चालणार नाही. तलावाचे ड्रेनेज चॅनेल्स चुकीच्या उंचीवर आहेत. भरतीचे पाणी आत येते, पण ओहोटीला गाळ बाहेर जात नाही. जोपर्यंत हे चॅनेल्स तांत्रिकदृष्ट्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत प्रदूषणाचे हे चक्र थांबणार नाही.

तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे यंदा या परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. ज्योती नाडकर्णी यांनी खंत व्यक्त केली की, नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने या ‌‘गुलाबी पाहुण्यांनी‌’ पाठ फिरवली आहे. तलावाला त्याचे जुने ‌‘पिंक ब्युटी‌’ रूप परत मिळवून देण्यासाठी केवळ स्वच्छता नको, तर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुनर्संचयित करण्याची गरज रेखा सांखळा आणि संदीप सरीन यांनी व्यक्त केली आहे. प्रशासकीय पाऊल पडले असले तरी, जोपर्यंत भरती-ओहोटीचे नैसर्गिक मार्ग मोकळे होत नाहीत, तोपर्यंत डीपीएस तलावावर टांगती तलवार कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT