Neral news
सापाने अडवले नेरळकरांचे पाणी ; ग्रामस्थ भयभीत pudhari photo
रायगड

सापाने अडवले नेरळकरांचे पाणी ; ग्रामस्थ भयभीत

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभाराने नेरळकर अगोदरच कंटाळले आहेत. त्यात आता ग्रामपंचायत हद्दीतील एका नागरिकाच्या पाण्याच्या पाईपलाईन मधून पाणी येत नव्हते. पाण्याच्या समस्येने हैराण या नागरिकाने खाजगी प्लम्बरकडून पाणी का येत नाही याचा शोध घेतला असता पाईपलाईनमधून चक्क 3 फुटी मृत साप आढळून आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात नागरिक भयभीत झाले असून साप पाईपलाईनमध्ये आला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या प्रकाराबाबत नेरळ ग्रामपंचायत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.

  • या सापाला पाहून नझे कुटुंब व परिसरातील नागरिक सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

  • दरम्यान पिण्याच्या पाईपलाईन मधून हा साप बाहेर आलेला पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.

  • तर या प्रकारबाबत नेरळ ग्रामपंचायत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार नेरळ गावातील स्टेशन आळी परिसरातील तबरेज नझे यांच्या घरात गेले दोन दिवस पाणी येत नव्हते. त्यामुळे नझे कुटुंब हे पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाले होते. नेरळ ग्रामपंचायतमधील पाणी विभागाचे कर्मचारी यांना सांगून देखील ते समस्या सोडवायला आलेच नाहीत. त्यामुळे खाजगी कर्मचारी घेऊन त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. पाईपलाईन मधून कुठे गळती होते का याची चाचपणी करण्यात आली. मात्र कुठेही पाईपलाईन फुटली असल्याचे आढळले नाही. शेवटी जलवाहिनी उघडून बघण्याचा निर्णय खाजगी कर्मचारी यांनी घेतला. तेव्हा पाण्याच्या वोल्वजवळ सुमारे अडीच ते 3 फुटी मृत साप त्या जलवाहिनीमध्ये अडकून पडल्याचे निदर्शात आले. त्या सापामुळे ग्रामस्थांचे पाणी अडले होते.

पाण्याच्या पाईपलाईनमधून साप बाहेर पडणे ही किती वाईट आहे. व्हॉल्वजवळ साप अडकून पडला त्यामुळे हा प्रकार समजला अन्यथा तो टाकीत येऊन पडला असता तर समजले नसते आणि तेच पाणी आमच्याकडून पिण्याला देखील वापरले गेले असते. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने शोध घेऊन पुढे अशी घटना घडू नये याकरिता पाइपलाइनला जाळी वगैरे लावणे गरजेचे आहे.
तबरेज नझे, ग्रामस्थ
संबंधित प्रकार आम्हाला समजला त्यामुळे हे कसे घडले याची माहिती करण्यासाठी ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना सांगण्यात आले आहे. पाईप लाईन हि सगळीकडून बंधिस्त असते मात्र तरीही संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
अरुण कारले, ग्रामविकास अधिकारी नेरळ ग्रामपंचायत
SCROLL FOR NEXT