नेरळ : नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येणार्या नेरळ शहरातील राजेंद्रगुरुनगर येथील अंबिका अपार्टमेंट इमारतीमधील बंद फ्लॅटचा दरवाज्याची कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटयांनी तब्बल 2 लाख 49 हजार रुपयांच्या सोन्याचा ऐवज लंपास करून पोबारा केल्याची घरफोडीची घटना ताजी असताना, पुन्हा अज्ञात चोरटयांनी एकाच इमारतीमधील चार फ्लॅट टारगेट करून, 67 हजार रूपये किमतीचा ऐवज लांबवला असल्याची घटना घडली आहे.
नेरळमधील राजेंद्रगुरूनगर येथील राहाणार गणेश राजेंद्र सनगरे यांचे राजेंद्रगुरूनगर येथील अंबिका अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील 106 फ्लॅटचा आतील दरवाजा व सेफ्टी दरवाजा लॉक करून नेहमीप्रमाणे 2 सप्टेंबर रोजी चोरट्यांनी घरफोडी करून 2 लाख रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज लंपास केला होता.
आता पुन्हा 8 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान नेरळ हेटकर आळी येथील सुमन कॉम्प्लेक्स बी विंग पहिला मजळ्यावरील राहाणार फिर्यादी श्रवण गिरधारीसिंग राठोड तसेच मंगेश अनंत परब, निखिल अशोक अडूळकर, पांडुरंग जयराम शिवगण यांचे बंद फ्लॅटच्या दरवाज्यांच्या कडीकोयंडा हे रात्रीचे सुमारास चोरट्यांनी तोडून घरामध्ये घुसून, फिर्यादी यांचे घरातील बेडरुममधील कपाटात ठेवलेले कानातील सोन्याची बाली, एक ब्रेसलेट, चांदीचे पैजण तीन जोडी असा एकूण 67 हजार रूपये किमतीचा ऐवज हा चोरटयांनी लांबवल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात फिर्यादी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात या अज्ञात चोरटयांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीच्या गुन्ह्यांचा पुढील तपास हा कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवले यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक गच्चे हे करीत आहेत.