नेरळ (रायगड) : नेरळ ग्रामपंचायत दिवाबत्ती प्रकरणात भष्ट्राचार झाल्याचे निष्पन्न झाले असून, नियमबाह्य खर्च करत सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रशासन यांच्या कडे सादर करण्यात अहवालानुसार सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील कार्यरत माजी सरपंच व ग्रामसेवक यांना दोषी ठरवत कोणती कार्यवाही होणार याकडे मात्र तक्रारदार यांच्यासह समस्त नेरळकरांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीमध्ये सन. २०१९ ते २०२४ या दरम्यान स्ट्रीट लाईटमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार रिपब्लिकन सेनेने केलेली होती. त्या तक्रारीनुसार नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये
चौकशी समितीची बैठक झाली .त्यात नियमाबाह्य खर्चा झाल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार चौकशी समिती मार्फत अहवाल हा रायगड जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रशासन यांच्या कडे सादर करण्यात आला आहे. सदर अहवालामध्ये दिवाबत्ती उपकरण खरेदीमध्ये नियमबाहय खर्च केल्याचा ठपका हा चौकशी समिती मार्फत ठेवण्यात आला आहे.
रिपब्लिकन सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश परमार यांनी दि. २० मे २०२५ रोजी स्ट्रीट लाईटमध्ये लाखोचा अपहार झाल्याची तक्रार ही कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांच्याकडे केली होती. परंतू कोणत्या ही प्रकारे कार्यवाही होत नसल्याने, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष यांनी तक्रारी अर्जासह आंदोलनाचा इशारा देताच सदर प्रकरणी कर्जत पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकरणी दि. २० जून २०२५ रोजी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणी करीता गट विकास अधिकारी सुशांत पाटील, विस्तार अधिकारी उज्वला पी भोसले, विस्तार अधिकारी विजय आ राजपूत, ग्रामसेवक अरूण कार्ले, तक्रारदार संतोष पवार व मंगेश परमार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली होती.
ग्रामपंचायत अधि नियम १९५९ चे कलम ५७ नुसार पंचायतीचे कडे
नमुना नं. ७ व नमुना नं. १० अनुसार जमा होणाऱ्या रक्कमा ग्राम निधी बँक खात्यावर जमा केल्या नंतरच खर्च करणे अपेक्षित असताना तसे न करता परस्पर रोखीतून खर्च केला असल्याचा, तसेच ग्रामपंचायतीसाठी सन २०१९-२० ते २०२४-२५ मध्ये ग्रामनिधी खात्यातील रक्कम खर्च करताना रक्कम रुपये ५००० वरील निधी हा निविदा प्रक्रिया न राबविता रक्कम रुपये २६,१९,१५ ही मात्र नियमबाहय पद्धतीने खर्च केलेचे, व खरेदी करताना दर्जा योग्य वाटत नसेल तर योग्य दर्जाच्या वस्तूंचे स्थानिक बाजारातील दर कमी असतील तर तेथून खरेदी करणे अपेक्षित असताना ग्रामपंचायतीने तशी कार्यवाही केली नसल्यामुळे, लेखा सहिता २०११ मधील नियमांचा अवलंब केलेचे दिसुन येत नाही. आदी बाबींचा उल्लेक करत सबब, ग्रामपंचायत नेरळ येथील सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील स्ट्रीट लाईट खरेदी व
दुरुस्ती करताना प्रशासकीय अनियमितता झालेली दिसून येत आहे. संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांचे विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७मधील नियम ३ चा भंग केल्याचा ठपका हा चौकशी समिती मार्फत सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये नेरळ ग्रामपंचायती विरूध्द ठेवण्यात आला आहे.
चौकशीत माहिती उघड
चौकशी सुनावणी दरम्यान माहे एप्रिल सन २०१९ ते मार्च २०२५ या कालावधीतील उपलब्ध दस्तावेज तपासणीनुसार कर्जत पंचायत समितीच्या सचौकशीमिती मार्फत सन २०१९ ते मार्च २०२५ पर्यंत दिवाबत्ती लेखा शिर्षकाखाली नेरळ ग्रामपंचायती कडून रक्कम रु. ४१,७१,९४३ इतकी रक्कम खर्च करणे व सदर कालावधित खर्च करताना ग्रामपंचायतीकडून झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी समितीकडून खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदवित २०,९३२४ ही ग्राम निधी मध्ये जमा न करता दिवाबत्ती लेखा शिर्षकाखाली ग्रामपंचायत अधिकारी यांचे हात शिल्लक रकमेतून खर्च करण्यात आली.