Neral Dowry Harassment Case Pudhari
रायगड

Neral Dowry Harassment Case: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ! बंदुकीचा धाक, पतीने ठेवले डांबून...

नेरळ पोलिसांकडून सुटका; पाचजणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: हुंड्यासाठी एका विवाहितेला खोली डांबवून ठेऊन तसेच थेट पिस्तूल रोखून जीव घेण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार कर्जतमधील नेरळ येथे उघड झाला आहे. याप्रकरणी पती, सासु, सासरे, दीर आणि जाऊ अशा पाच जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरळ परिसरातील सुवर्णा (सासर कडील नाव) हिचा चार वर्षांपूर्वी रोहा तालुक्यातील वाशी-धाटाव येथील एका इसमाबरोबर विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले; मात्र पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर असलेले संबंध उघड झाल्यानंतर घरात वादाचे वातावरण निर्माण झाले. ‌‘तू मला आवडत नाहीस‌’ असे म्हणत पतीने वारंवार मारहाण सुरू केली.

पतीच्या जुगाराच्या व्यसनामुळे परिस्थिती आणखी चिघळली. जुगारात पैसे गमावल्यानंतर माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला. विवाहितेचे दागिने काढून घेण्यात आले. मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तिचा अपमान करण्यात आला, तसेच तिच्या चारित्र्यावरही संशय घेत मानसिक छळ करण्यात आला.

या त्रासाला कंटाळून विवाहितेने नेरळ गाठत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सासरच्या मंडळींना बोलावून घेतल्यावर त्यांनी ‌‘आता पुढे नीट वागू‌’ असे सांगत माफी मागितली. मात्र ही माफी केवळ दिखावा ठरली. घरी परतताच ‌‘पोलिसांत तक्रार करतेस का?‌’ असा जाब विचारत पुन्हा तिच्यावर अत्याचार सुरू करण्यात आले.

यानंतर घर बांधण्यासाठी माहेरून तब्बल 2 लाख रुपये आणण्याची सक्ती करण्यात आली. या मागणीला विरोध करताच विवाहितेवर थेट पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप पिडित महिलेने केला आहे. इतकेच नव्हे तर पतीने तिला खोलीत कोंडून बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

अखेर जीव वाचवण्यासाठी विवाहितेने कसाबसा मोबाईल मिळवत 112 हेल्पलाईनवर संपर्क साधला. माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तात्काळ धाव घेत तिची सुटका केली. त्यानंतर ती नेरळ येथे परतली आणि माहेरच्या मंडळींच्या माध्यमातून पती, सासू-सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

रायगड जिल्ह्यात हुंड्यासाठी महिलांचा छळ करण्याच्या घटना घडत आहेत. काही घटनांमध्ये महिला पुढे येतात, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होते आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT