Nayan Vitthal Wagh MPSC success story
नेरळ ः जयवंत हाबळे
दहावीत तीन वेळा नापास झालेल्या कर्जतच्या नयन विठ्ठल वाघ या आदिवासी युवकाने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्यात 15 वा क्रमांक पटकावला आहे. त्याचा हा प्रेरक प्रवास युवा पिढीला दिशा देणारा असाच आहे.
ऐनाची वाडी या आदिवासी वाडीत राहणाऱ्या वाघ कुटुंबात कुणी शिकले नव्हतं. त्यामुळे मुलांने शिकावं यासाठी विठ्ठल वाघ यांनी मेहनत घेतली. मात्र मुलगा नयन हा कसाबसा दहावीपर्यंत पोहचून त्याला तब्बल तीन प्रयत्न करूनदेखील त्याला यश येत नव्हतं. शिक्षणात लक्ष नसलेला नयन वाघ याला पाहून त्याच्या वडिलांनी देखील तो शिकेल ही आशा सोडून दिली. मात्र त्याच्या आयुष्यात आलेले एक शिक्षक हे त्याच्या आयुष्याला वळण देणारे ठरले. मात्र पुढे येणाऱ्या अनेक संकटाचा सामना करून नयन वाघ याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आदिवासी विभागातून राज्यात 15 वा क्रमांक मिळवला आहे.
साधारण 150 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या वाडीत विठ्ठल वाघ आणि त्याचं कुटुंब राहतं. मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी मेहनत केली. मात्र नयन याला शिक्षणाची विशेष गोडी नव्हती. त्यामुळे 10वीच्या परीक्षेत नयन नापास झाला. मात्र वडिलांच्या इच्छेखातर त्याने आणखी दोन वेळा परीक्षेचा प्रयत्न केला. मात्र त्यातही त्याला यश न आल्याने वडिलांनी देखील मुलगा शिकेल ही आशा सोडून दिली. आणि नयन मजुरी करण्यासाठी जाऊ लागला.
शिक्षक असलेले पुंडलिक कंटे यांच्याकडे नयन मजुरीच काम करताना त्यांनी नयन याला शिक्षण विचारलं. त्यांनी नयनकडे पुन्हा शिकण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पुन्हा एकदा दहावीतील गेलेले विषय पुन्हा सोडवत नयन वाघ याने दहावी सहज रित्या सोडवली. बारावीमध्ये महाविद्यालयात त्याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर कर्जत कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश मिळवत त्याने भूगोल या विषयात पदवी संपादन केली. सलग तीन वर्षे त्याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले, मात्र अनेकदा थोडक्यासाठी संधी हुकली. असे असले तरी नयन याने जिद्द सोडली नाही.
2019 मध्ये त्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. हे सगळ करत असताना शिक्षणासाठी मजुरीचे काम देखील सुरू ठेवले तर घरच्यांनी देखील त्याला हातभार लावण्याचे काम केले. याच दरम्यान कोरोनामुळे परीक्षा रद्द झालेल्या होत्या. त्यामुळे घरच्यांनी नयनचे लग्न ठरवलं. पूनम सोबत त्याचे लग्न झाले मात्र त्याने आपलं स्वप्न सोडलं नाही. यातच नयनच्या वडीलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावर आली.
2022 मध्ये बायकोला माहेरी पाठवत पालघर येथील जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे शिक्षण सुरू केले. त्याचदरम्यान पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीत पायाला इजा झाल्याने ती संधी हुकली. यानंतर वॉकर घेऊन त्याने अभ्यास सुरू ठेवला. 2024 मध्ये काठी घेऊनच त्याने लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली. तसेच आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेची स्कॉलरशिपची परीक्षा देखील दिली.
बायकोने शिवणकाम करत केली मदत
लग्न झाल्यावर सहाच महिन्यात नयन याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केल्याने पत्नीला माहेरी पाठवून दिले. जेणेकरून तिची परवड व्हायला नको. पूनम ही पदवीपर्यंत शिकलेली असल्याने तिने नवऱ्याची साथ दिली. कपडे शिलाई करून मिळणाऱ्या पैशातून तिने पती नयन याला हातभार लावला.