गणपतीचे गाव पेणमध्ये नवदुर्गांची क्रेझ file photo
रायगड

Navratrotsav 2024 | गणपतीचे गाव पेणमध्ये नवदुर्गांची क्रेझ

पुढारी वृत्तसेवा

पेण : गणेशोत्सवानंतर लगेच येणारा सण म्हणजे नवरात्रोत्सव (Navratrotsav 2024). हा नवरात्रोत्सव सुध्दा महाराष्ट्रातील सर्वच नागरिक साजरा करीत असतात. यासाठी सार्वजनिक मंडळे अधिक पुढाकार घेत असतात. त्यामुळे शहरांतील गावातील प्रत्येक मंडळे देवीची मूर्ती पेण तालुक्यांतून मागवित असतात, यासाठी अगदी दोन फुटापासून, ते दहा फुटापर्यंतच्या मूर्ति पेणमधील विविध कार्यशाळेतून मागविल्या जातात.

पेणच्या कार्यशाळेतून हजारों मूर्ति ह्या मागील महिन्यापासूनच राज्यातील अनेक शहरात मागविण्यात आल्या आहेत. तर पेण तालुक्यांत आणि रायगड जिल्ह्यात शेकडो नवदुर्गा मूर्ति मंडळाच्या ठिकाणी पोहोच झाल्या आहेत. राज्यात किमान वीस हजारांहून अधिक दर्गा मुर्ती रवाना झाल्या आहेत तर जिल्ह्यात किमान दहा हजारांहून अधिक मंडळाकडून दुर्गा मूर्तीची ऑर्डर पुर्ण केल्याचे पेण तालुका मूर्तिकार संघटनेकडून सांगण्यात आले आहे. अजुनही एक ते दिड हजार मूर्ति या रायगड जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत जाणार असल्याचे मूर्तिकार विराज सावंत यांनी सांगितले आहे. (Navratrotsav 2024)

सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मुर्ती व लहान मूर्ती उत्सवासाठी सज्ज करण्यासाठी मूर्तिकारांनी आता शेवटचा हात मारण्यास सुरुवात केली आहे. विशेष करून तरुणाई या मंडळाच्या ठिकाणी नऊ दिवस जातीने हजर राहते. मंडळाची मूर्ती जेवढी आकर्षक तेवढाच उत्सवाचे स्वरूप मोठे असते.

नवरात्री उत्सव मंडळाची आवड यावर्षी मोठ्या मूर्तीवर जास्त करून आहे, साधारणपणे आठ फूट, दहा फूट, बारा फूट उंचीच्या नवदुर्गाच्या वाघावर, सिंहावर, कोंबडधावर, हत्तीवर, आणि राजसिंहसनावर आरूढ झालेल्या देवीच्या मूर्ती यासह महिषासुरमर्दिनी चंडिका, अंबिका, एकविरा, कोल्हापुरची अंबाबाई, माहूरगडावरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, नाशिकची सप्तशृंगी भवानी माता, सरस्वती माता लक्ष्मी या प्रकारातील मूर्ती कार्यशाळांमध्ये तयार झाल्या आहेत. याशिवाय याच प्रकारातील एक फुटापासून तीन फुटापर्यंत उंचीची नवदुर्गाच्या मूर्ती सुद्धा मागणीनुसार रंगविल्या आहेत, असे पेणमधील अनेक मुर्तीकाराने सांगीतले आहे.

दांडिया गरबाचे विशेष आकर्षण

मंदिरातल्या देवी देवतांपेक्षा सार्वजनिक मंडळांकडे नवरात्री उत्सवा प्रसंगी दांडिया गरबा भोंडला या कार्यक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणात गर्दी खेचण्यात सार्वजनिक मंडळी यशस्वी होतात दिसतात. ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये प्रामुख्याने पूजापाठ, भजन, कीर्तन, प्रवचन या कार्यक्रमावर भर असतो, मात्र सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या उत्सव मंडपात दांडिया गरबाचे विशेष आकर्षण असते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT