कळंबोली : अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर राज्य सरकारने नवी मुंबईमधील दुसऱ्या मेट्रोला मंजूरी दिली आहे. सिडकोने 15 वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा राज्य सरकराजवळ मांडला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी तब्बल 5,575 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणांना जोडणी मिळणार असून पुढे नवी मुंबई विमानतळाशीही जोडण्याची योजना आहे.
मेट्रो 1 आणि मेट्रो 2 च्या जोडणीसाठी 2.2 किमी विस्ताराची गरज असणार आहे ज्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही आहे. दरम्यान, 2 किमी स्पर मार्गिकेने नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पण थेट जोडणीचा प्रस्ताव आहे.
ही 8.15 किमी लांब मार्गिका तळोजा आणि खांदेश्वरदरम्यान उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे कामोठे, कळंबोली आणि तळोजासारख्या शहरांना जोडणी मिळणार आहे. यामुळे पनवेल परिसरातील विकासालाही चालना मिळणार आहे. ही मेट्रो तयार झाल्यानंतर नवी मुंबई शहरात रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ अशा प्रमुख पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या मेट्रोचा प्रस्ताव पहिल्यांदा 2011मध्ये सिडकोने मांडला होता. त्यावेळी या मार्गाचा खर्च 1,605 कोटी रुपये अपेक्षित होता. 15 वर्षात हा खर्च 5 हजार 575 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गिकेवर एकूण 8 स्थानकं प्रस्तावित आहेत. ही मार्गिका कामोठे, कळंबोली, तळोजा एमआयडीसी आणि खांदेश्वर या भागांमधून जाणार आहे. या मार्गावर खांदेश्वर, कामोठे सेक्टर 10, कळंबोली सेक्टर 2, कळंबोली सेक्टर 7, कळंबोली सेक्टर 13, कडाडी, एमआयडीसी स्थानक 1, एमआयडीसी स्थानक 2 अशी आठ स्थानके प्रस्तावित आहेत. सध्या नवी मुंबईमध्ये बेलापूर ते पेंढार मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकेशी नवी मुंबई मेट्रो 2 ला थेट जोडण्याचा देखील प्रस्ताव आहे.