पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिल्याने या विषयाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नवी मुंबई परिसरात उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, अद्याप या विमानतळाचे अधिकृत नामकरण झालेले नाही. विमानतळासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांनी सुरुवातीपासूनच या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने केली आहे. या मागणीसाठी विविध संघटना आणि स्थानिक नागरिकांनी अनेक आंदोलने, मोर्चे तसेच उपोषणेही केली आहेत. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासने मिळाली असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर दिबा पाटील यांच्या जयंतीदिनी, २४ जून रोजी शेकापचे नेते राजेंद्र पाटील यांनी एक आगळावेगळा मार्ग अवलंबला. त्यांनी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची भावनिक आणि ठाम मागणी केली. या पत्रामध्ये दिबा पाटील यांनी प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून विमानतळाला त्यांचे नाव देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राजेंद्र पाटील यांनी यापूर्वीही विविध माध्यमांतून आणि आंदोलनांच्या माध्यमातून ही मागणी लावून धरली होती. मात्र, अद्याप निर्णय न झाल्याने त्यांनी रक्ताने पत्र लिहून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली असून, आता केंद्र सरकार या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.