Navi Mumbai Abu Dhabi Flight Pudhari
रायगड

Navi Mumbai Abu Dhabi Flight: नवी मुंबई विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मुहूर्त; अबू धाबीसाठी थेट सेवा

एअर इंडिया एक्सप्रेसची आठवड्यातून तीन दिवस थेट सेवा

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए: अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (एनएमआयए) नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रारंभ होत असून, एअर इंडिया एक्सप्रेस १५ जुलैपासून नवी मुंबई–अबू धाबी मार्गावर आठवड्यातून तीन दिवस थेट उड्डाण सेवा सुरू करणार आहे.

२५ डिसेंबर २०२५ रोजी देशांतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या २०० दिवसांतच विमानतळाने आंतरराष्ट्रीय सेवेचा टप्पा गाठला आहे. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीसाठी थेट आणि अधिक सोयीस्कर हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे. तसेच, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जच्या अखत्यारीतील सर्व विमानतळ आता आंतरराष्ट्रीय सेवांशी जोडले गेले आहेत.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणा, नियामक संस्था तसेच सर्व भागधारकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.

पहिल्या आंतरराष्ट्रीय मार्गासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या काळात अधिक विमान कंपन्या आणि नव्या आंतरराष्ट्रीय गंतव्यांचा समावेश करत जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यावर आमचा भर राहील.

एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष निपुण अग्रवाल म्हणाले की, नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी थेट सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. या मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना यूएईसाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

आमच्या दुहेरी विमानतळ धोरणात नवी मुंबई विमानतळाची महत्त्वाची भूमिका असून, या भागीदारीतून भविष्यात आणखी व्यापक हवाई संपर्क निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

अवघ्या सात महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४६ देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित करत २३ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावर दररोज सुमारे १५० हवाई वाहतूक हालचाली होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT