बहुचर्चित असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 30 सप्टेंबरला होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. यावेळी सिडकोचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
देशातील सर्वात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पाहणीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना या विमानतळावर उपलब्ध होणार्या सुविधा व कनेक्टिव्हिटीविषयी महत्त्वाची माहिती दिली.
या विमानतळाच्या भौतिक कामांची प्रगती सध्या 94 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. विशेष म्हणजे, विमानतळाचा छताचा भाग (सेसिलिंग) आणि अंतिम टप्प्यातील अंतर्गत डिझाईनचे काम प्रगतीपथावर आहे.
एकदा पूर्ण झाले की हे विमानतळ देशातीलच नव्हे तर आशियातील एक महत्त्वाचे हवाई दालन ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळ हे केवळ एक प्रवासाचे ठिकाण न राहता, हे ‘फ्युचर रेडी’ एअरपोर्ट असेल. इथे प्रवाशांना बॅगेज ट्रॅकिंगसाठी 360 डिग्री बारकोड स्कॅनिंगची सुविधा असेल. जगातील सर्वात वेगाने प्रवास करणार्या बॅगेज सिस्टीमपैकी एक याठिकाणी कार्यान्वित केली जाणार आहे.
विमानतळावर एक किमीपर्यंत चालण्याऐवजी ‘ट्रॅव्हलर’ सुविधा (ऑटोमेटेड वॉकवे) देण्यात येणार आहे, जेणेकरून वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना कोणतीही अडचण भासणार नाही. या विमानतळाच्या दोन रनवे पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर वर्षाला तब्बल 9 कोटी प्रवाशांच्या सेवा देता येणार आहेत.
मुंबई विमानतळाच्या तुलनेत हे विमानतळ अधिक विस्तृत आणि आधुनिक असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विमानतळाचे काम 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
या विमानतळावर पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. अंडरग्राउंड मेट्रो ट्रेनची सुविधा दिली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर थेट पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. याशिवाय जलमार्गाद्वारे ‘वॉटर टॅक्सी’ची सेवा देखील कार्यान्वित केली जाणार आहे. हा भारतातील काही मोजक्या शहरांत उपलब्ध असलेला सुविधा पर्याय ठरणार आहे. नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, कल्याण या परिसरातील नागरिकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मार्गिका व विशेष कनेक्टिव्हिटी नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.