रायगड ः नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्वाही मिळाल्याने दिबा संमर्थक आनंदी असतानाच, आता विमानतळाच्या उद्धाटनाची तयारी सरकारच्या स्तरावर जोरात सुरु आहे. अशा परिस्थितीत उद्धाटनाचा दिवस कोणत्याही क्षणी अंतिमतः जाहिर होवू शकते, या पार्श्वभूमीवर एअर इंडिया समुहाकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनासाठी योजनेची निश्चिती केली असून पहिल्या टप्प्यात दररोज 20 विमानांचे उड्डाण देशातील 15 शहरांकरीता नियोजित करण्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एअर इंडिया समूहाची व्हॅल्यू कॅरियर एअर इंडिया एक्सप्रेस एनएमआयएपासून एनएमआयएपर्यंत दररोज 20 दैनिक उड्डाणे देशातील 15 भारतीय शहरे जोडली जातील. एअर इंडिया समूह जून 2026 पर्यंत दररोज 55 उड्डाणे वाढवण्याच्या नियोजनात आहे. त्यात दररोज 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणे समाविष्ट होणार आहेत.
एअर इंडिया समुहाकडून कार्यान्वयनासाठी नियोजन
एअर इंडिया समूहाचे उद्दिष्ट 2026 च्या हिवाळ्यापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज 60 उड्डाणे करण्याचे आहे. त्यातून प्रवाशांना प्रमुख देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थळांशी विनासायास जोडले जाईल अशी माहिती एअर इंडिया व्यवस्थापनाने दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ उर्वरित भारताशी जोडणारा दुवा नाही, तर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हींसाठी देशातील एक महत्त्वाचे जागतिक केंद्र ठरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण पाच टप्प्यात बांधले जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी वाहतूक आणि 0.5 दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतूक होणे अपेक्षीत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर तिथे 90 विमानसेवा देण्याची आणि दरवर्षी 3.2 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता असेल. दरम्यान प्रारंभिक टप्प्यात एअर इंडिया एक्सप्रेसकडून 15 हून अधिक शहरांकडे दररोज 20 उड्डाणे नियोजित आहे तर 2026 च्या हिवाळ्यापर्यंत दररोज 60 उड्डाणे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.